कळा अवकळा

एका जुन्या स्नेह्यांना भेटायला गेले होते. घरात दोघेच ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांच्या तरुण वयात दोघे अतिशय टापटीप, कामसू, घरात सात आठ माणसे असूनही घर प्रसन्न असायचं, स्वच्छ असायचं. परवा त्या घरात शिरल्या शिरल्या एक नकोसा वास घरात भरून राहिलेला जाणवला. कुबट, औषधं, न धुतलेले कपडे, अंगाला येणारा वास, घरभर खच्चून भरलेली कपाटं आणि त्यावर धुळीचा थर! शोकेसमध्ये मुलांच्या बालपणापासून असलेल्या वस्तू , त्यांनी शाळेत मिळवलेली पदके, बक्षिसं केविलवाण्या अवस्थेत पडलेली दिसत होती. कामवाली बाई येऊन दहा मिनिटात बाहेर पडत असावी हे कळत होतं.

ही सध्या बऱ्याच घरातली स्थिती आहे असं वाटत नाही का? स्वतःला होत नाही आणि दुसऱ्याकडून करून घेता येत नाही, मुलंबाळं जवळपास नाहीत आणि असलीच तर, अती ज्येष्ठांची मुलंबाळं ही ज्येष्ठ असतात. त्यात घरातल्या माणसांना “त्या” वासाची इतकी सवय झालेली असते की त्यांना त्यात काही वावगं वाटत नाही. पण बाहेरून आलेल्या माणसाला तिथे बसवत नाही हे सत्य आहे.

मला तर त्या घरात “पाणी तरी पी” म्हणून आग्रहाने हातात ठेवलेला ग्लास बघूनही भीती वाटत होती. काय करता येईल? काय करू शकतो?

आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर urban clap सारख्या कंपनी कडून कधीतरी घर स्वच्छ करून घ्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे, सामान कमी करावे. आता कधीही वाचली न जाणारी, हातातही धरता न येणारी जाडी जाडी पुस्तके काढून टाकावी. शोकेस रिकाम्या कराव्यात. नेसता न येणाऱ्या भरजरी साड्या, कपडे केवळ भावनिक गुंतवणूक म्हणून ठेऊ नयेत. ठेवलेल्या कपड्यांना बाहेरची हवा दाखवलीच नाही तर वास येणारच ना?

रोजच्या वापरात कमीत कमी भांडी ठेवावी. “कधीतरी कोणीतरी येतील” म्हणून ठेवलेली तरुणपणातली मोठी मोठी भांडी कमी करावीत. अती ज्येष्ठांकडे जेवायला खायला किंवा राहायला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या नगण्य असते. बाहेर देशातून आलेले पाहुणेही वर्षातून एकदा येणार!

आवरा, आवरा! सामान आवरा, मनाला आवरा, मोहाला आवरा!
घराला अवकळा येऊ देऊ नका!

तुम्ही काय उपाय योजना करता ते ही सांगा म्हणजे इतरांना समजेल.

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading