“संसार रथाची दोन चाके – पण डुगडुगणारी !”
“पती, पत्नी म्हणजे संसार रथाची दोन चाके” असं पूर्वीपासून म्हटलं जात असे. पण यातलं एक चाक खिळखिळं झालं की दुसऱ्या चाकावर रथ सुरळीत कसा चालेल?
हे मी, माझ्या वयाच्या, चाळीस आणि पन्नास, साठच्या दशकात जन्माला आलेल्या लोकांसाठी लिहिते आहे.
सध्याची तरुण पिढी खूप हुशार आणि स्वावलंबी आहे. स्वतःच्या पैशाचा योग्य वापर/ आर्थिक नियोजन मुली, स्त्रिया आजकाल हुशारीने करतात. त्याचबरोबर, तरुण मुलं सराईतपणे स्वयंपाकघरात वावरत असतात. त्यामुळे ही पोस्ट तरुण पिढीला उद्देशून नाहीये.
पूर्वापार चालत आलेली नवरा बायकोच्या कामाची विभागणी या वयातही कित्येक घरात दिसून येते. आयुर्मान वाढल्यामुळे, ७५ वर्षांची पत्नी स्वयंपाकघरात काम करते आहे आणि नवरा चहाचा कपही उचलत नाही हे दृश्य दिसतं. तसंच, बँकेची पासबुक, investments हे सगळं पतीच्या ताब्यात असलेलं दिसतं.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपल्या देशाचे अर्थकारण चालवतात. महिलांनी स्वतःच्या, घराच्या “अर्थकारणाची” जबाबदारी का घेऊ नये असा माझा प्रश्न आहे.
आमच्या काळात, स्त्रिया उच्च शिक्षण घेत होत्या, नोकरी करत होत्या. पण बहुतेक घरांमध्ये, आलेला पगार, वडिलधाऱ्यांकडे किंवा लग्नानंतर नवऱ्याकडे सोपवण्याची पद्धत होती. कुटुंबाचे नियोजन एक हाती होत असे. त्यामुळे स्त्रियांना काही माहितीही नव्हती आणि जाणून घेण्याची उत्सुकताही नव्हती. नवऱ्याने सांगितलेल्या चेक वर किंवा कागदावर सह्या करायच्या की झालं काम! आणि मग अचानक जबाबदारी अंगावर पडली की काय करणार? मुलंबाळं मदतीला जवळपास असतील तर ठीक. नाहीतर आर्थिक व्यवहारांबद्दल काहीही माहित नाही अशा अनेक स्त्रिया मी बघितल्या आहेत. “अमुक बँकेत खातं आहे हे माहित आहे, पण ब्रँच कोणती ते नाही माहित!” अशी सुशिक्षित स्त्रियांची परिस्थिती.
कित्येक महिलांची तक्रार असते की पुरुषांनाच बायकोची लुडबुड नको असते. “तुला काही कळणार नाही, मी आहे ना!” असं म्हणून त्यांच्या कॉम्प्युटर मध्ये, पासवर्ड प्रोटेक्टेड आर्थिक नियोजन बंदिस्त असतं. बायकोला, नवऱ्याच्या कॉम्प्युटरचा किंवा मोबाईलचा पासवर्ड ही माहीत नसतो. तर बँकेच्या खात्यांची , शेअर्स ची, इतर गुंतवणुकीची माहिती कुठून असणार??
माझ्या जवळच्या मैत्रिणीची कथा. नवऱ्याने नोकरी सोडून पूर्णवेळ शेअरचा धंदा सुरू केला. ऑफिस, धंदा माझ्या मैत्रिणीच्या नावावर होता. तो सतत मागे लागायचा की नुसत्या सह्या करू नकोस, प्रत्येक कागद वाचत जा, मी काय करतो आहे ते शिकून घे. “तू असताना मला काय काळजी?” असं म्हणत हिने उच्च शिक्षित असूनही कधीही लक्ष घातलं नाही. दुर्दैवाने कार अपघातात त्याचं निधन झालं. तिसऱ्या दिवशी दारासमोर घेणेकऱ्यांची लाइन लागली. काय अवस्था झाली असेल तिची?
आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे. “मी बायकोला सगळं समजावून सांगितलं आहे. तिला माहित आहेत आमच्या इन्व्हेस्टमेंट्स.” असं म्हटलं जातं. पण फक्त माहित असणं आणि स्वतः लक्ष घालणं यात खूप फरक आहे.
“आता फायनान्सिअल एडवाईसर उपलब्ध असतात, मग आम्ही लक्ष कशाला घालायचं?” असंही एकीने विचारलं. पण advisor आपले पैसे, कुठे आणि कसे गुंतवतो आहे ते तर आपल्याला समजलं पाहिजे ना?
म्हणून माझी सगळ्या मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे की वेळेवर लक्ष घाला, माहिती करून घ्या, शिकून घ्या!
फक्त घरखर्च चालवला म्हणजे नियोजन नाही. निदान आहे तो पैसा राखून ठेवायचा , एवढं यायलाच पाहिजे. “शेअर्स मध्ये खेळा” असं कोणीही म्हणत नाहीये. पण आपण “आहोत” तोपर्यंत तरी आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
पुरुषांची परिस्थिती ही काही वेगळी नाही. वर्षानुवर्ष आईच्या आणि नंतर बायकोच्या हातच्या चवीची सवय झालेल्यांना, अचानक स्वयंपाकिणीच्या हातचं जेवायला लागतं तेव्हा खूपच जड जातं. “ती गेल्यावर मी चहा करायला लागलो. पण मला नाही जमत तिच्या सारखा चहा. म्हणून मी चहाच सोडून दिला.”😔 अशी केविलवाणी अवस्थाही मी बघते आहे.
सध्या घरात ज्येष्ठ दोघेच राहत असल्याचे सर्रास चित्र पाहायला मिळते. जर नवऱ्याला आजारपण आलं तर बायकोने त्याची सेवा करायची हा आपल्याकडे प्रघातच आहे. आणि त्याबद्दल इतर कुटुंबीयांनाही काही वावगं वाटत नाही. पण तेच, बायको दीर्घ आजाराने आडवी असली तर किती पुरुष तिची “सेवा” करतात? म्हणजे एरवी नवऱ्याच्या आजारपणात जे काम स्त्री करते – उदा. जेवायला – खायला घालणे/ भरवणे, औषधं देणे, घरातली आणि बाहेरची कामेही सांभाळणे पासून अंघोळ घालणे, डायपर बदलणे पर्यंत सर्व. दोघेच राहत असतील तरीही बायको आजारी पडली, तर लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीकडून किंवा स्वतंत्र राहणाऱ्या सुनेकडून अपेक्षा केली जाते, नाहीतर केअरटेकर ठेवली जाते.
अपवादात्मक उदाहरणे आहेतही. आमचे एक मित्र, आम्ही त्यांना ओळखत असल्यापासून बायकोची सेवा करत होते. आणि आम्हाला त्यांचं खूप कौतुक वाटायचं. एकदा घरी आले असताना मी पोहे, चहा त्यांच्यासमोर ठेवल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मला म्हणाले, “मी याआधी बायकोच्या हातचं कधी खाल्लं होतं ते मला आठवतच नाही.” ते शांत झाल्यावर आपणहून म्हणाले, “माझं कौतुक करण्यासारखं काही नाही हो. मी विचार करतो की हेच उलट झालं असतं तर? तेव्हा तिचं कोणी कौतुक केलं असतं का? आपण गृहितच धरतो घरातल्या स्त्रीला!”
घरात काम करायची सवय नसल्याने, स्त्री चा हात फिरत नसलेल्या घराची केविलवाणी अवकळा बघवत नाही. दोघांनीही निदान निवृत्ती नंतर, समान कामं करायला सुरुवात केली तर आयुष्याची संध्याकाळ दोघांची किंवा मागे राहील त्या एकट्याची सुखाची जाईल असं वाटत नाही का??
संध्या घोलप


Leave a Reply