हाँगकाँगट्रिप भाग १

तयारी.. मानसिक आणि शारीरिक

जानेवारीत मुलगा म्हणाला, “आई, आपण मार्च मध्ये ट्रीपला जायचंय. तुझा पासपोर्ट दे”.
मुलांबरोबर ट्रिप असली की मी डोकं बाजूला ठेवते. मला काय आवडेल, काय झेपेल हे त्यांना बरोब्बर माहीत आहे.

जिथे जाऊ तिथे पायी फिरायचं, स्थानिक ट्रान्सपोर्ट वापरायचा तरच ते शहर, ते गाव, तिथली माणसं, राहणीमान आपल्याला कळतं असं मला वाटतं. “History of architecture” अभ्यासात होतं त्यामुळे त्या शहराची जुनी बाजू बघायला मला आवडते. Conducted टूर बरोबर आपण गेलो की एका ठिकाणाहून बस मध्ये बसा आणि दुसऱ्या ठिकाणी उतरा, मधल्या प्रवासात बसच्या खिडकीतून जे काही दिसेल ते पहा! म्हणजे खरं तर दूरदर्शन ट्रिप असते.

आम्ही गोव्याला गेलो तर चांदोर, दीवार आयलंड, fontainhas पायी फिरलो, पाँडिचेरीला फ्रेंच कॉलनी पायी बघितली, अगदी सिंगापूरला पण बस, मेट्रो, पाय वापरून १९०० साली बांधलेल्या घरांपासून जुन्या बैठ्या घरांचा भाग पायी बघितला. जुन्या इमारती आणि पार्श्वभूमीवर नवीन टोलेजंग इमारती! शहराचा इतिहासच समोर येतो.

“मी चालून दमले” असं म्हटलं की मुलगा म्हणायचा,”अगं, फक्त २०००० स्टेप्स झाल्या आहेत!” 😀😀
त्यामुळे हाँगकाँग ट्रिप ठरल्यावर मी पहिली मानसिक तयारी केली की आता रोज जास्त चालायचा सराव करायला हवा!

हळूहळू ट्रिप आकाराला येऊ लागली. मुलाने सगळी बुकिंग करून टाकली.
४८०००/- रु प्रत्येकी विमानाचे तिकीट, १२०००/- रु हॉटेलची खोली( त्यात ब्रेकफास्ट होताच) आणि प्रत्येकी ५० हाँगकाँग डॉलर्स भरून घेतलेली ऑक्टोपस ट्रॅव्हल कार्डस. एकूण ७ रात्री, आठ दिवस!

“हाँगकाँग ला सात दिवस कशाला? दोन तीन दिवस भरपूर झाले” असा सल्ला “जाणकारांकडून” मिळायला लागला. पण आमचं सगळं आरामात असतं, त्यामुळे मला काळजी नव्हती. मुलगा, सुनेनी मिळून प्रत्येक दिवसाचा प्लान ठरवला होता. त्यात नुसती स्थळं लिहिलेली नव्हती तर किती वाजता निघायचं, कसा प्रवास करायचा ( ट्राम, बस, मेट्रो, बोट, टॅक्सी की पायी) किती वाजता पोहोचायचं, परत कसं आणि किती वाजता यायचं इतका सविस्तर प्लॅन होता. अर्थात तिथे हे शक्य होतं कारण बस/ ट्राम बरोब्बर सांगितलेल्या वेळेला हजर असतात.

“आई, तिथे खूप गरम होतं, मुंबईसारखीच हवा आहे. सात दिवसांसाठी सात जोडी कपडे, जायला यायला वेगळे आणि एखादा जास्तीचा पाहिजे. बॅग मोठी झाली तरी चालेल, आम्ही आहोत बरोबर! आणि छत्री पण घे, तिथे कधीही पाऊस पडतो” अशा विविध सूचना यायला लागल्या.

नवीन shoes घे आणि लगेच वापरायला लाग म्हणजे त्याची सवय होईल, कॅप घे, मास्क पण असू दे!
मी बाळ आणि मुलगा आई झाला होता! 😀
माझी बॅग बघून तो चक्रावला! एवढी छोटी बॅग? पण मला सोलो ट्रिपची सवय असल्याने, मला झेपेल अशी एक चेक इन आणि एक केबिन – अशा दोन बॅगा असतात माझ्या! तरी दोन्ही मिळून वजन १२ किलो झालं! 😀

अखेर जायचा दिवस उजाडला. त्याच दरम्यान नेमका पुणे मुंबई महामार्ग ओसंडून वाहत होता. ट्रॅफिक जाम मुळे
आठ आठ तास लागत होते. आम्ही रात्री १ वाजताच्या फ्लाईट साठी सकाळी सात वाजता पुण्याहून निघालो! आणि ट्रॅफिक पार करून ११ वाजता वाशीच्या घरी पोहोचलो! आता दिवसभर आराम….

रात्री तीन तास आधी एअरपोर्ट वर पोहोचलो. सगळे सोपस्कार आवरून विंडो शॉपिंग करून, खादाडी करून गेट समोर येऊन बसलो. पाऊण वाजता बोर्डिंग होतं म्हणून मी साडेबारा वाजता झोपेची गोळी घेतली. की आत चढलो की झोपून जायचं! मी गोळी घेतली आणि गेटवर डिस्प्ले आला की फ्लाईट एक तास लेट आहे! आता आली का पंचाईत! मी मुलाकडे बघितलं. तो म्हणाला, झोप, मी आहे!

बोर्डिंग करताना, मुलानी आणि सुनेनी मला दोन्ही बाजूंनी धरलं. मुलगा म्हणाला, “आई काय funny चित्र दिसतंय हे! आई झिंगते आहे आणि मुलगा, सून तिला धरून नेतायेत!” 🤣🤣
विमानात बसल्या बसल्या मी गाढ झोपले ते लँडिंग च्या वेळेलाच उठले!
बाकी नंतर…

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading