मी लिहिते.. (मी लिहिते?? )

शाळेतल्या निबंधापासून, वक्तृत्व स्पर्धेपासून थोडंफार लिहायला सुरुवात झाली होती. शिक्षक कौतुक करायचे म्हणून हुरूप यायचा. पण शाळा सुटली आणि लिखाणात बराच मोठा खंड पडला.

प्रसंगानुरूप, मुक्त छंदात कविता लिहित होते ( अर्थात रूढार्थाने त्याला कविता म्हणायला मीच धजावत नाही).

वयाच्या चाळीशीत नोकरी सोडली आणि लिखाणाचा किडा पुन्हा वळवळायला लागला. सहज म्हणून लिहिलेली कथा माहेर मासिकात छापून आली आणि मी लिहित सुटले. भरपूर कथा, लेख छापून यायला लागले. त्यावेळेला प्रसिद्ध होणारी मराठी मासिकं — माहेर, मेनका, स्त्री, किर्लोस्कर, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ताचे हास्यरंग, रोहिणी यात कथा लिहिल्या.

मग पुन्हा दहा बारा वर्षांचा खंड!

फेसबुक सुरू झालं आणि मला जणू काही कॅनव्हास मिळाला. मनात येईल ते लिहायचं आणि पोस्ट करायचं! कथालेखन बंद झालं होतं. आता विषय अगदी आजुबाजूला दिसणारे!

रस्त्यात पाहिलेली एखादी व्यक्ती, ऐकलेलं संभाषण, वृत्तपत्रातली अस्वस्थ करणारी बातमी, ऐकलेली गाणी, स्वतः घेतलेले अनुभव, ज्येष्ठांचे जाणवलेले प्रश्न, पाहिलेलं नाटक अथवा सिनेमा, माझ्या ट्रिप्स…. कोणत्याही विषयावर मी लिहित असते. अडचण हीच आहे की “अमुक विषयावर लिही” किंवा “अमुक तारखेपर्यंत लेख पाठव” हा प्रकार मला अजूनही जमत नाही. मैं अपने मनकी सुनती हूॅं!

त्यात फेसबुकवर “मुंबई स्वयंपाकघर”, “वृद्धांचे पालकत्व”, “आम्ही साहित्यिक” असे ग्रुप्स दिसले आणि मी लिहिती राहिले. माझ्या लिखाणाला काही वाङमयीन दर्जा आहे का? तर अजिबात नाही. मला अलंकारिक भाषा वापरता येत नाही. माझ्या लिखाणात उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास असं काहीही दिसत नाही. कसलाही खोल विचार, अबोध चर्चा नसते.

मनातून आलेलं, मनाला भावलेलं, साधं सोपं लिखाण असतं. मला तेवढंच येतं आणि तेच आवडतं. बघा वाचून, तुम्हालाही आवडतं आहे का!

संध्या घोलप