आता तरी जाग बा ग्राहका
मध्यंतरी पेपरमध्ये ही बातमी वाचली. आपल्या घरात काय किंवा घराबाहेर काय, प्लास्टिकचा वापर अती प्रमाणात होतो आहे, हे आपण सर्व जाणतो. प्लास्टिक वापरणं वाईट आहे, हे ही आपल्याला माहीत आहे. पण केवळ सोय म्हणून आपण या धोक्याकडे चक्क दुर्लक्ष करतो.
आता तर वरच्या बातमीप्रमाणे, चक्क डिमेंशिया पेशंटच्या मेंदूत प्लास्टिकचे कण सापडले! म्हणजे प्लास्टिक आपल्या नसानसात भिनलं आहे हे सिद्ध झालं आहे. पण तरीही आपण दुर्लक्ष करतो आहे!
का?? कशासाठी? निदान आपल्या पुढच्या पिढीच्या काळजीसाठी तरी आपण प्लास्टिक वापर बंद करणार आहोत का नाही?
प्लास्टिकचा जेव्हा शोध लागला तेव्हा
त्याचे दुष्परिणाम लक्षात आले नाहीत. एखादा नवीन शोध लागला की त्याच्या वापरानंतरच त्यातील दोष लक्षात यायला लागतात. (जसे मोबाईलचे दुष्परिणाम आता दिसतायेत) प्लास्टिकच्या वापरानंतर म्हणजे जवळजवळ ७०- ८० वर्षांनंतर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. आधी “उपयुक्त” वाटलेलं प्लास्टिक, “उपद्रवी” आहे —-निसर्गासाठी, वातावरणासाठी, पर्यावरणासाठी आणि अर्थातच मानव जातीसाठी हे आता सिद्ध झालं आहे.
पण आपण “उपभोग” घ्यायचं थांबत नाही.
“गाईच्या पोटातून ४० किलो प्लास्टिक बाहेर काढले” किंवा “प्लास्टिक मुळे जलचर प्राणी धोक्यात” अशी बातमी वाचून आपण हळहळतो, ‘चक् चक् ‘ करतो आणि आपण पान उलटतो. प्लास्टिक biodegradable नाही, १००० वर्षापर्यंत त्याला काहीही होत नाही, पण आपण वापरतच असतो आणि कचरा वाढवत असतो. हल्ली कुठल्याही समारंभात, वीतभर लांबीच्या पाण्याच्या बाटल्या, अक्षरशः शेकड्यांनी वापरल्या जातात, अर्धवट पाणी पिऊन फेकून दिल्या जातात! भाजी आणायला बाहेर गेलो की दहा रुपयाच्या कोथिंबिरीसाठी “भय्या, थैली दे दो” म्हणायला आपण कचरत नाही. ती पिशवी घरी आणली की लगेच कचऱ्यात जाते, तिथून पुढे डम्पिंग ग्राउंड वर! मुंबईत, लोकल मधून प्रवास करताना, बाहेर नजर टाकली तर फक्त प्लास्टिक थैल्यांचे ढीग दिसतात. शासनाने पिशव्यांवर बंदी घातली की दोन तीन दिवस दुकानदार ते पाळतात. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या…
प्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट म्हणाले होते की अमेरिकेत “फेक” संस्कृती आहे. म्हणजे fake – फेक नाही तर मराठी फेक!
उचला की फेका! अमेरिकेचा सगळा कचरा landfills मध्ये जातो, समुद्रात जातो ! आणि जागा असल्यामुळे त्यांना त्याची काही चिंताही वाटत नाही.
आपल्या कडे मात्र आपल्या जमिनी आणि जमिनीखालील पाण्याची पातळी आधीच दूषित झालेली आहे. आणि याचा आपल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. पिकांचा परिणाम अर्थातच आपल्या शरीरावर होतो आहे.
तरीही आपण अजून झोपेत आहोत!
Waste management चे तीन “R” असतात. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे “Refuse” ! जे आपण आधी अंगिकारलं पाहिजे. दुसरं आहे
“Re-use”. आणि तिसरं “Recycle”. पहिल्याचा स्वीकार केला तर दुसरी दोन वापरायची वेळच येणार नाही.
नुकताच “वंदे भारत” ट्रेन नी प्रवास केला. ट्रेनचं खूपच कौतुक ऐकलं होतं. पण ब्रेकफास्ट आणि जेवणाच्या नावाखाली जे काही waste जमा होतं ते बघून मला धक्काच बसला.
त्यासाठी वेगळा ऑप्शन काय आहे मला माहित नाही. पण हे फक्त एका ट्रेनचं झालं. संपूर्ण भारतात, फक्त रेल्वे मधून, रोजचा किती टन कचरा निर्माण होत असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे आपण फक्त ढिगारा वाढवत जायचं! मग पूर आला, प्लास्टिक मुळे ड्रेनेज तुंबलं, घरात पाणी शिरलं की “शासन काही करत नाही” असं ओरडायला आपण मोकळे!
आता तर ते आपल्या मेंदूत घुसलं आहे! डिमेंशिया पेशंटच्या मेंदूत प्लास्टिकचे कण सापडावेत हे ही आपल्याला धोकादायक वाटत नाहीए का??
जमिनीचा कस आधीच खालावला आहे, जमिनीखालची पाण्याची पातळी आधीच दूषित झाली आहे. मग अजून काय व्हायचं बाकी आहे?
” मी प्लास्टिक वापरत नाही, मी कचऱ्यात टाकणार नाही” असं टिळकांसारखं (मी शेंगा खाल्ल्या नाहीत च्या चालीवर)बाणेदारपणे म्हणणं कधी जमणार आहे आपल्याला?
मी गेल्या सात आठ वर्षांपासून, कापडी पिशवी, स्टीलची पाण्याची बाटली सतत माझ्याबरोबर ठेवते. कुठेही ट्रीपला गेले तरी. Disposable cups मधून चहा कॉफी दिली तर नाकारते. नसली तरी चालेल पण मी एक कप वाचवला याचं समाधान. “तुझ्या एकटीमुळे असा काय फरक पडणार आहे? ” असं म्हणून माझी चेष्टाही केली जाते. पण माझं बघून निदान आणखी काही लोक जागृत झाले तर ही साखळी सुरू राहील.
वंदे भारत ट्रेन मध्ये मी पाण्याची बाटली घेतली नाही आणि कर्मचाऱ्याला सांगितलं की ही परत घेऊन जा, मी घेणार नाही. त्याने माझ्या देखत ती कचऱ्यात टाकली! आता काहीही झालं की आपण करोना कडे बोट दाखवून मोकळं होतो!
कधी आणि कशी येणार जागरूकता?? ![]()
निदान अशा “भयावह” बातम्या वाचून तरी जागे होऊया. प्लास्टिक पिशव्या वापरल्या जाणार नाहीत याची तरी काळजी घेऊ. आपल्या स्वयंपाकघरात निदान नवीन प्लास्टिक डबे, बाटल्या येणार नाहीत याची काळजी घेऊ. व्यापारी, दुकानदार त्यांचा माल खपविण्यासाठी जागरूक असतात. आपण “ग्राहक” जागरूक होऊया.
आता तरी जाग बा ग्राहका!
अशी “फुकटचे” उपदेश देणारी पोस्ट लोकांना आवडत नाही, कोणीही पोस्ट पूर्ण वाचणार नाही,असे सल्ले मिळूनही मी हे पोस्ट करते आहे. बघूया ….
संध्या घोलप



Leave a Reply