काल फ्रेंच ओपन बघायला बसले. बाप माणूस खेळत होता. त्यामुळे माझे डोळे टीव्ही ला चिकटले होते. समोर एक बाळ खेळत होतं. पहिले दोन सेट्स बाप माणसाने खिशात घातले.
अरे अरे! तीन सेट मध्ये संपणार वाटतं मॅच! काही मजाच नाही येणार. मी मनात म्हटलं.
मग तिसरा… चौथा.. पाचवा… बाळ माणूस झपाटल्यासारखा खेळत होता. बाप माणसाचं दडपण न घेता! शांत डोक्याने… बाप माणसाने स्वतःच्या अनुभवाने केलेले हल्ले परतवत !
बाप माणूस आधीच उन्हाने कावला होता. चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. पण तो ही आपलं कौशल्य, अनुभव पणाला लावत होता. आता बाप माणसाने विश्रांती घ्यावी असं एक मन सांगत होतं तर बाप माणूसच जिंकावा असं दुसरं मन म्हणत होतं!
शेवटी तीन फाडफाड सर्विसेस करत, बाळ माणूस जिंकला! बापमाणसाने त्याला जवळ घेऊन पाठ थोपटली.
बाळ माणूस कोर्टवर एकटाच उभा राहिला आणि काय झालंय याची त्याला जाणीव झाली! “आपण जिंकलोय?? बाप माणसा बरोबर खेळून? “
त्या वेळेला त्याच्या डोळ्यात जे अश्रू उभे राहिले ना, ते बघून मलाही भरून आलं… केवढी मोठी achievement! वय वर्ष ३९ विरुद्ध वय वर्ष १९!! अशी कुठे मॅच असते का?? एकाला अती जास्त अनुभव, दुसऱ्याच्या पारड्यात वयाचा उत्साह, जोम!
लगेच लोक म्हणायला लागले की हा काही सतत जिंकणार नाही. कदाचित पुढच्याच मॅचला हरेल. हरू दे की! पण आजचं त्याचं यश का हिरावून घेता?
नोवाक म्हणाला होता की मी रिटायर झालो की मला फोन्सेका चा कोच व्हायला आवडेल. केवढी मोठी पावती आहे ही!
मॅच संपली, टीव्ही बंद केला आणि डोक्यात विचार आला… नोव्हाक नाही, सिनर नाही, अल्काराझ तर स्पर्धेतच नाही! आता कोणाला बघायचं??
आहेत की ही नवी बाळ माणसं! त्यांना बघू, ती ही काही वर्षांनी होतील बाप माणसं!
संध्या घोलप



Leave a Reply