वाढते वय, वाढते आजार, वाढता खर्च

माझी आई ८० वर्षांची असताना तिला गुडघे दुखीचा त्रास सुरू झाला. “या वयात कशाला ऑपरेशनचा खर्च करायचा?” असा तिचा प्रश्न होता. डॉक्टर म्हणाले की “हे ऑपरेशन वाढत्या वयातच करायचं असतं ना? टॉन्सिल्स जसं लहान वयात करतात, तसं knee replacement, cataract, heart surgery ही म्हातारपणासाठीच राखून ठेवलेली आहेत.” आज तिच्या ऑपरेशनला १३ वर्ष झाली आहेत. आईचं वय ९३ आहे आणि ती अजूनही छान चालते आहे.

एक मैत्रीण, कॅटरॅक्ट चं ऑपरेशन करायला घाबरत होती. “नको बाई, डोळा गेला-बिला तर काय करणार? आत्ता निदान अंधुक तरी दिसतंय” म्हणाली. तिचा नवरा म्हणाला,”निदान डॉक्टरकडे जाऊन तपासून तरी ये.” दुर्दैवाने तो काचबिंदू होता. पण वेळेवर उपचार केल्यामुळे डोळा वाचला.

आपलं आयुष्य किती शिल्लक आहे हे आपल्याला माहित असतं का? मग “या वयात कशाला खर्च करायचा” असं म्हणून आपण काय टाळत असतो? ९५ वर्षांच्या एका सर्जननी गेल्या वर्षी, डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं. डोळ्यांची डॉ त्यांच्यापेक्षा ३५-४० वर्षांनी लहान. तिलाच खूप टेन्शन आलं होतं. पण डॉ तिला म्हणाले की मी फक्त ५०% शक्यता धरतो आहे. जे काही आयुष्य शिल्लक आहे ते निदान माझ्याच डोळ्यांनी पाहून घालवलं तर मला बरं वाटेल. त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं.

दहा वर्षांपूर्वी बायपास झालेले एक स्नेही (वय वर्ष ७५), नियमित सायकल चालवतात, टेबल टेनिस खेळतात आणि ट्रेकिंग ही करतात. त्यांचं म्हणणं आहे की मी जेवढा अँक्टिव्ह राहीन तेवढं माझं हृदय मला साथ देईल. एकाच जागेवर बसून राहिलो तर परत बायपास करायची वेळ येईल 😀

अर्थात बाकी शारीरिक व्याधी कोणत्या आहेत, त्यानुसार ऑपरेशन झेपणार आहे की नाही, आर्थिक परिस्थिती कशी आहे यावरही कोणतेही ऑपरेशन, करायचं की नाही हे अवलंबून असतं. नुकत्याच एका ट्रीपला भेटलेल्या सखीने, मुलीच्या आग्रहामुळे, कॅन्सर सारख्या मोठ्या आजारपणानंतर संपूर्ण जग पालथे घातले होते. मुलगी म्हणाली की तुझ्या पैशाची आम्हाला आवश्यकता नाही. तुला मिळालेलं आयुष्य, ट्रिप मधे तुझे पैसे खर्च करून आनंदात घालव. त्याउलट एका सखीला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आढळला आणि तिने डॉ ना सांगितलं की मला उपचाराचा खर्च करायचा नाही. तिने तिच्या सर्व जवळच्या माणसांना घेऊन एकत्र क्रूझ केली. ते १५ दिवस, तिने जमा केलेल्या आठवणी, ते क्षण हीच तिची केमोथेरपी होती.

दातांमुळे खायला -प्यायला त्रास होत असलेल्या एका ८० वर्षांच्या मैत्रिणीने, नुकतेच दोन लाख खर्च करून, कायमची कवळी बसवून घेतली आहे. आता तिचे वजनही छान वाढले आहे. आधी प्रत्येक पदार्थ मिक्सर मधे वाटून मग खाण्याचा तिलाही कंटाळा आला होता. आणि त्यामुळे वजन खूप कमी झालं होतं.

वय वाढल्यावर होणारे काही आजार, म्हणजे पुरुषांना प्रोस्टेटचा त्रास होणं आणि महिलांना, गर्भाशय खाली घसरणे. हे दोन्ही आजार अजूनही जाहीरपणे बोलले जात नाहीत. ज्येष्ठ नागरिक हा त्रास सहन करतात, पण कोणाला सांगत नाहीत, अगदी डॉक्टर कडेही वाच्यता करत नाहीत. जेव्हा आजार गंभीर रूप धारण करतो, तेव्हा पळापळ होते. वाढत्या वयात होणाऱ्या कोणत्याही आजाराकडे “आता काय करायचंय ट्रीटमेंट घेऊन?” असे न पाहता, उर्वरित आयुष्य आपल्याला सुखात घालवता येईल आणि इतरांची धावपळ होणार नाही असा विचार करावा.

बऱ्याच ज्येष्ठांना डायपर वापरायला आवडत नाही. एकतर ते महाग असतात आणि त्याचे बाकी त्रास पण होतात.अगदी अंथरुणावर पडल्याशिवाय डायपर वापरायचा नाही असाच त्यांचा दृष्टिकोन असतो. पण त्यामुळे बाहेर जाण्यावर मर्यादा येतात. साधं नाटका सिनेमाला जायचं तरी पंचाईत! छोटा प्रवास ट्रेन किंवा विमानाने असेल तर ठीक आहे. बसने ट्रीपला जायचं असेल तर चालतच नाही. मग डायपर वापरून, नाटक सिनेमा किंवा छोटी ट्रिप करून उर्वरित आयुष्यात, मनमुराद आनंद लुटता येणार असेल तर तेवढ्यापुरता डायपर वापरायला काय हरकत आहे? पण “मी घराबाहेर पडणार नाही आणि मी डायपर वापरणार नाही” असा फुकाचा बाणा काय कामाचा? घराबाहेर अजिबात न पडल्यामुळे होणारे मानसिक ताण वेगळेच!

कवळी बसवणे, नवीन चष्मा करून घेणे, कानाचे मशीन घेणे, मानेला – कमरेला आधारासाठी आवश्यक तो पट्टा लावणे, नवीन काठी घेणे, पायाला आरामदायक
अशी पादत्राणे घेणे — हे खर्च याच वयात करायचे असतात आणि ते आपल्या सुखी आयुष्यासाठी असतात. कानाचे मशीन बसवले नाही तर समोरचा माणूस काय बोलतो आहे हे तुम्हाला ऐकू येत नाही.पण शेजाऱ्यांना मशीन न लावताही ऐकू येतं हे ध्यानात घ्यावे! 😀

ज्येष्ठांनो, “आता या वयात कशाला खर्च करायचा?” असा विचार सोडा आणि आवश्यक असेल तिथे स्वतःच्या खिशाप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर खर्च करा.

संध्या घोलप

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20260612_9_2

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading