हिंदी गाण्यातले प्रश्न आणि प्रश्नातली “लता – The Great”!
मी टीव्हीवर फक्त गाण्याचे कार्यक्रम बघते. सारेगम आणि इंडियन आयडॉल वगैरे. बाकी मालिका, बातम्या वगैरे फारच बेसूर असतात त्यामुळे बघायला आवडत नाहीत! ![]()
इंडियन आयडॉल ची फायनल काल सुरू झाली. स्नेहा शंकर मला आवडते. छान गाते. त्यामुळे तिच्याकडे जरा जास्त लक्ष असतं. गेल्या आठवड्यात तिने लताचं “जाने क्या बात है” गाणं म्हटलं आणि काल नंदिनी श्रीकरचं ” क्यूँ , न बोले मोसे मोहन क्यूँ ” म्हटलं. तिने छान म्हटलं, गाणीही छानच आहेत. पण मला लता बाईंची प्रश्नार्थक गाणी आठवायला लागली. आणि त्या, गाण्यात सुद्धा प्रश्न किती छान विचारतात असं जाणवून गेलं. संगीतकार, गीतकार यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. पण तरीही लताबाईंच्या आवाजात जी जादू आहे, जे भाव आहेत ते शब्दात नाही सांगता येत.
कौन है जो सपनोमे आया मधला प्रेमळ रफी, आँखोमे क्या जी गाण्यातआशाचा अवखळपणा, क्या से क्या हो गया गाण्यात रफीचा दर्द, काहे तरसाये जियरा (आशा, उषा), कौन आया मेरे मनके द्वारे किंवा आत्ताचं क्यूँ न बोले मोसे मोहन क्यूँ ही सगळी प्रश्नार्थक गाणी एका बाजूला आणि लताबाईंचं “आप क्यूँ रोए” एका बाजूला! असं मला वाटतं.
बाईंनी यातलं “क्यूँ” इतक्या विविध प्रकारे म्हटलंय की त्यातली आर्तता, आर्जव आपल्या हृदया पर्यंत जाऊन पोहोचतं.
“ग़मोंकी आग हमने खुद लगायी, आप क्यों रोए” या ओळीतला क्यूँ इतका जीवघेणा आहे की त्या मनोज कुमारला गदागदा हलवून विचारावं असं वाटतं की अरे ती एवढी विचारते आहे तर सांग ना! ![]()
पण बाई यावरच थांबत नाहीत. “अनुराधा ” सिनेमातली दोन्ही गाणी “कैसे दिन बीते” आणि “हाय रे वो दिन क्यूँ ना आये” एकापेक्षा एक वरचढ! कैसे दिन बीते ची सुरुवात ज्या “हाय ” नी केली आहे तो दुसरा कोणीही म्हणू शकत नाही असं माझं ठाम मत आहे.
“माझे दिवस कसे गेले आणि रात्री कशा घालवल्या हे त्या पियाला काय कळणार ” हे सगळं दुःख गाण्याच्या सुरुवातीलाच त्या एका “हाए ” मधून बाई दाखवून देतात.
तसंच हाये रे वो दिन क्यूँ ना आये मधल्या “क्यूँ” वर हलकीशी मींड त्या प्रश्नाला खूप खोल अर्थ देऊन जाते.
कहीं ये वो तो नहीं, जरासी आहट होती है गाण्यात ‘कहीं ये वो तो नहीं’ हे पण इतक्या प्रकारे म्हटलं आहे की आपल्यालाही वाटायला लागतं की खरंच, हाच तर तो नाही??
ना जाने क्यूँ, होता है यूँ जिंदगीके साथ
हे गाणं असूदे किंवा
क्या जानू सजन होती है क्या गमकी शाम,
किंवा
जाने क्यूँ लोग मोहब्बत किया करते हैं, लता बाईंचे प्रश्न हे आपल्या मनातही प्रश्न उभे करतात. आपण प्रश्नचिन्ह लिहून प्रश्न उपस्थित करतो. बाई ते काम गळ्यातून करतात.
आणि त्यातलच अलीकडचं गाणं (तरी तीस एक वर्षांपूर्वीचं) म्हणजे “जाने क्या बात है” हे सनी चित्रपटातलं गाणं. अमृता सिंगचा पहिलाच सिनेमा आणि तिला बिचारीला बाईंच्या आवाजावर तोंड हलवायचं होतं!
गाणं बघू नये.
पण या गाण्यातही “जाने क्या” इतकं सुंदर म्हटलंय की पुढचं “नीन्द नहीं आती, बडी लंबी रात है” वगैरे सगळं खरं वाटायला लागतं.
पण ही सगळी शांत, संयत किंवा दुःखी गाणी झाली.
“क्या हुवा, ये मुझे क्या हुवा क्या पता” या आशा बरोबर गायलेल्या अल्लड अवखळ गाण्यातही लताबाई “क्या हुवा” मधल्या शेवटच्या अक्षरावर हलकेच वळण देत प्रश्नचिन्ह निर्माण करतात!
स्नेहा शंकर च्या निमित्ताने आज एवढे प्रश्न उभे राहिले! ![]()
बघा, तुम्हाला पण अजून काही आठवतंय का!
संध्या घोलप
(मूळ कल्पना डॉ मृदुला दाढे यांची आहे. श्रेय त्यांना!
)


Leave a Reply