राम नवमी

“माय” मराठी की “my” मराठी?

मनात आलेले प्रश्न लोकांसमोर मांडायलाही आताशा भीती वाटते. कधी कोण कसा अर्थ काढेल आणि आपल्याला चपराक बसेल, सांगता येत नाही.

पण राहवत ही नाही…

नुकताच पाडवा झाला, आज राम नवमी! मराठी माणसांकडून, मराठी माणसाला, “मराठीत” सणांच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या जाव्यात ही किमान अपेक्षा!

अगदी दिवाळीतही आपल्याला happy diwali म्हणणं जास्त सोपं वाटतं!! एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून, बँका आणि केंद्रीय कार्यालयात आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे आपणच सगळं “happy अमुक happy तमुक” करतो आहोत!

टीव्हीवर मराठी कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नाच का केले जातात, मराठी गाण्यांच्या स्पर्धेच्या कार्यक्रमात हिंदी गाणी का म्हटली जातात असं आपण विचारतो आणि आपणच मराठी सणांच्या शुभेच्छा इंग्लिश मधून देतो!

आज तर गंमत बघायला मिळाली. राम नवमीच्या कार्यक्रमानंतर, केक कापला गेला आणि

“Happy birthday to you

Happy birthday to you

Happy birthday dear Rama sssss

Happy birthday to you”

असं एकमुखाने, टाळ्या वाजवून म्हटलं गेलं!

मी तर वाट बघत होते की आता

You are one, you are two असं सुरू होत आहे की काय! 😛

निदान जिथे “what is Ram Navami?” किंवा “when did Ram (उच्चार रामा) born?” असे प्रश्न कोणी विचारत नाही (कारण मराठी डोकी जास्त असतात) , तिथे तरी किमान “रामनवमीच्या/ रामजन्माच्या हार्दिक शुभेच्छा” किंवा नुसतच “जय श्रीराम” म्हणावं नाहीतर “व्हॉट्सॲप” करावं ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे??

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading