लढा — विस्मरणाशी

(#Dementia)

मी “अथश्रीत” राहायला येऊन आता तीन महिने होतील. बऱ्याच ओळखी झाल्या, हौशी रहिवाश्यांनी सुरू केलेल्या “स्मरणवेध” क्लासला जायला लागले, रोजचं रूटीन ठरलं.

अशातच भेट झाली श्री जयंत व सौ अनुराधा दीक्षित यांची. अनुराधा ताईंशी बोलणं झालं आणि मी भारावूनच गेले. किती प्रेरणादायी कहाणी आहे त्यांची!

श्री जयंत दीक्षित, वय वर्ष ८५, गेली तेरा वर्ष विस्मरणाशी लढा देत आहेत. आणि त्यांच्या सह उभ्या आहेत त्यांच्या अर्धांगिनी वय वर्ष ७६! त्यांना सांभाळत, आधार देत, या लढ्यातल्या खंद्या शिपाई बनून.

याला लढा म्हणायचं कारण हे आहे की एकदा हा आजार स्वीकारल्यावर, दोघांनीही त्याचा “डोळसपणे” सामना केला. अभ्यास केला आणि त्याप्रमाणे शक्य असतील ते सगळे उपाय केले. सुदैवाने आर्थिक स्थिती चांगली असल्याने त्यांना हे शक्य झालं.

पेशाने Coastal and oceanographic Engineer असलेले श्री जयंत दादा निवृत्त झाल्यानंतरही दहा वर्ष, “विज्ञान वाहिनी” संस्थेतर्फे स्वयंसेवी शिक्षक म्हणून काम करत होते. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. पण चिकाटीने, फिजिओथेरपी केल्यामुळे ते पुन्हा उजव्या हाताने लिहू सुद्धा लागले. पण पुन्हा पाच वर्षांनी, मेंदूत रक्तस्त्राव होऊन रक्ताची गुठळी तयार झाल्याचं निमित्त झालं. मेंदूतल्या ठराविक पेशींना प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने त्याचं कार्य मंदावलं आणि हळूहळू विस्मरणाची लक्षणं दिसू लागली.

साधारण २०१२ मध्ये, दीनानाथ हॉस्पिटल मध्ये, डॉ मंगलाताई जोगळेकर यांनी “विस्मरणाच्या जनजागृतीसाठी” जो कार्यक्रम ठेवला होता, त्याला दीक्षित दांपत्य मित्राच्या आग्रहास्तव गेले आणि तिथे झालेल्या स्क्रिनिंग टेस्ट वरून, मंगलाताईनी, जयंत दादांना dementia ची सुरुवात असू शकते हे सुतोवाच केलं.

(उपस्थित प्रेक्षकांना ठराविक प्रश्न विचारून ही टेस्ट घेतली जाते.)

हा आजार, तोपर्यंत ‘कृतिशील असलेल्या या व्यक्तीला’ पचवणं हे कठीणच काम होतं. या आजाराची सखोल माहिती करून घेऊन तो स्वीकारणं, यासाठी ही डॉ नी खूप मदत केली.

आणि मग सुरू झाला विस्मरणाशी लढा!

वेळेवर टेस्टस् करणं, दादांना डॉ कडे घेऊन जाणं, औषधं पाणी हे काम अनुराधा ताईंचं. पण प्रश्न एवढ्यावरच थांबले नव्हते. दादांना आता आर्थिक व्यवहार जमत नाहीत हे लक्षात आल्यावर ताईंना ते ही नव्याने शिकून घेऊन, ताब्यात घ्यावे लागले. दादांना दिशा, वेळ, अंतर आणि गती याचा अदमास न राहिल्याने, गडबड व्हायला लागली. झोपेचं वेळापत्रक लहान मुलासारखं झाल्याने, रात्री जाग आल्यावर, सकाळ झाली असं समजून फिरायला जायला निघणे किंवा रस्ता चुकण्याचे प्रसंग येऊ लागले. त्यामुळे त्यांना एकट्याला बाहेर जाऊ न देणं, ही जबाबदारीही वाढली. आणि कंटाळा न करता, ताई रोज त्यांच्याबरोबर फिरायला जाऊ लागल्या. आधी दोघेही आपापल्या वेगाने, आपापल्या इच्छेने फिरायला जात होते. आता दोघांच्याही स्वातंत्र्यावर गदा आली! पण त्यावरही ताईंनी मार्ग शोधून काढला. मंगलाताईनी मेमरी लॅब मध्ये शिकवलेले खेळ – अक्षरांशी खेळणं, वेगवेगळी गाणी, भेंड्या वगैरे, या वॉकच्या वेळेला सुरू ठेवले.

“मेंदूच्या असलेल्या क्षमता टिकवायच्या आणि अधोगतीचा वेग रोखायचा” हेच केवळ आपल्या हातात आहे हे दोघांनीही स्वीकारलं होतं आणि त्याप्रमाणे पुढे जात होते.

विस्मरणाची अधोगती रोखण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते – हे दोघंही करत असतात याचं मला जास्त कौतुक वाटलं.

उतारवयात, मेमरी स्थिर राहावी यासाठी मेंदूला व्यायाम देणं आवश्यक आहे आणि ते काम आपण लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे, हे आता सर्वांना माहीत झालं आहे. त्यासाठी शब्दकोडी, सुडोकू सोडवणे, नवीन भाषा किंवा कला शिकणे हे उपायही आपल्याला माहीत आहेत.

इथे दादा सुडोकू, शब्दकोडी सोडवतातच. नवीन कला शिकण्यासाठी त्यांनी नातवाकडून Casio शिकायला सुरुवात केली. आजही ते नियमितपणे की- बोर्ड वाजवतात. यात बोटांचा व्यायाम, सुरांशी संगत आणि बिझी राहणं हे उद्दिष्ट. ते काही सराईतपणे की – बोर्ड वाजवत नाहीत पण ती अपेक्षाही नाही.

यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे, इंग्लिश पुस्तकांचं मराठीत भाषांतर करण्याची त्यांना आवड आहे. आणि आज त्यांचा तेराव्या पुस्तकाचा अनुवाद चालू आहे.

हा आजार होण्यापूर्वी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित ही झालं आहे. मी त्यांची वही बघितली. त्यावर लिखाण सुरू केल्याची वेळ, थांबवल्याची वेळ लिहिलेली असते. लक्षात राहण्यासाठी पुस्तकावर पण खूण केलेली असते. “आता अक्षर नीट येत नाही, पण मी हे माझ्या समाधानासाठी करतो.” असं दादा म्हणाले. अक्षर न समजल्याने पुढची पुस्तकं छापता आली नाहीत पण त्याचं त्यांना वाईट वाटत नाही. ते मनोभावे लिखाणाचं काम करतात.

त्यांचं रूटीन पण ठरलेलं आहे. सकाळी उठून चहा पाणी झालं की योगासनं करायची, ब्रेकफास्ट तयार होईपर्यंत की- बोर्ड वाजवायचा किंवा सुडोकू सोडवायचं. नंतर आंघोळ, पूजा! संध्याकाळी वेळेवर फिरायला जाणं, परत आल्यावर रामरक्षा!

यात म्युझिक थेरपी चा फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना हंसध्वनी, शिवरंजनी, जयजयवंती आणि दरबारी असे राग ऐकवावेत असं तज्ञांनी सांगितल्यावर अनुराधा ताईंनी त्याचीही सुरुवात केली.

“त्याचा खरच फायदा होतो का, हे मला माहित नाही. पण गाणं ऐकण्यात तोटा तर नाही ना? ” असा विचार करून त्या दादांना कधी instrumental, कधी रागावर आधारित गाणी असं नियमित ऐकवत असतात. दादांना जुनी गाणी तोंडपाठ आहेत. आमच्या मेमरीच्या क्लासमध्ये, “मोरावर” गाणी म्हणायची होती. तर दादांना “केतकीच्या बनी तिथे” हे पटकन आठवलं. तालासुरात ते गाणी म्हणतात.

एकदा चिठ्ठ्यांवर विषय लिहून दिले होते. चिठ्ठी उघडून लगेच त्या विषयावर बोलायला सुरुवात करायची होती. मी ताईंना म्हटलं की दादांची चिठ्ठी उघडा की आधी. त्यांना विचार करायला वेळ मिळेल. तर ताई म्हणाल्या, “नाही नाही, ते व्यवस्थित बोलतील. Extempore बोलायला आवडतं त्यांना.” मला दोघांचंही कौतुक वाटलं.

गेली तेरा वर्ष अनुराधा ताई, केवळ दादांच्या रूटीन साठी झटत आहेत. आता लांबचा प्रवास करू शकत नसल्याने त्यांचं मुलांकडे परदेशात जाणंही बंद झालं आहे. पण मुलं आणि नातेवाईक यांचा भक्कम मानसिक आधार त्यांच्या पाठीशी आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं. ताईंचं कौतुक केलं तर, त्या लगेच म्हणाल्या, “माझं काहीच नाही हो त्यात. यांनी ते स्वीकारलं आणि माझ्या प्रयत्नांना साथ दिली हे महत्त्वाचं. त्यांनी प्रयत्नच केले नसते तर मी काय करणार होते? मुळात त्यांचं strong spirit आणि positive attitude, जगण्यातला इंटरेस्ट यामुळे आम्ही सामना करू शकलो” (हे सगळे ताईंचेच शब्द आहेत!)

ते सहकारनगरहून आता पाषाणला राहायला आल्याने त्यांना मंगलाताईंच्या मेमरी लॅबला जाता येत नाही. पण इथे त्यांना “स्मरणवेध” हा पर्याय मिळाला आहे त्याचा त्यांना आनंद आहे.

Dementia चे पेशंट्स आपण सर्वांनी पाहिले आहेत. आठवत नाही म्हणून संवाद कमी/ बंद होतो, कशात रस वाटत नाही म्हणून दिवस दिवस पडून राहतात, व्यायाम नाही, स्वतःची स्वच्छता नाही, चिडचिड होते! असे वागण्यातले बदल दादांच्या बाबतीत कधी दिसले नाहीत. या सगळ्यापासून दादांना लांब ठेवण्यात ताईंचा हात आहे, हे निश्चित.

“कधीतरी माझाही पेशन्स जातो हो! पण नंतर मलाच जाणवतं की मी नॉर्मल माणसासारखी यांच्याकडून अपेक्षा केली. मग मी यांना सॉरी म्हणायला जाते, पण हे तोपर्यंत ती घटना विसरून गेलेले असतात. अर्थात त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून मला कळतं की माझा पेशन्स गेला आहे हे त्यांना समजलंय. पण ते कधी रुसून बसत नाहीत!”

अशा समजूतदार साथीदाराच्या प्रयत्नांना यश लाभो हीच सदिच्छा!

ही पोस्ट लिहिण्याचं महत्वाचं कारण हेच की विस्मरणाचा आजार होण्याची वाट न बघता, शारीरिक व्यायामासह, बुद्धीला/ मेंदूला चालना देणारे व्यायाम करणं अत्यावश्यक आहे, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे हीच इच्छा!

संध्या घोलप

(मूळ पोस्ट मराठीत आहे आणि मराठीतच वाचावी ही विनंती! गुगल इंग्लिश मधून जो काही अनुवाद करतं त्याला मी जबाबदार नाही! 😀)

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading