“Good morning काकू”
रोज सकाळी माझी मदतनीस आली की दाराबाहेरून आवाज देते. मी पण गुड मॉर्निंग म्हणत दार उघडते. आज नुसती कडी वाजली. मी दार उघडलं आणि म्हटलं, गुड मॉर्निंsss ग! काहीच उत्तर नाही. काहीतरी बिनसलंय एवढं लक्षात आलं. मी ही गप्प राहून, ती आपणहून काहीतरी बोलण्याची वाट बघू लागले.
कामात लक्ष नाहीये हे मला दिसत होतं. लादीला गुदगुल्या करत झाडू मारणं चालू होतं.
झाडू मारत मारत माझ्या जवळ आली. “काही होतंय का गं?” मी विचारलं आणि तिचे डोळे पाण्याने भरले. मानेनेच “नाही” म्हणत ती काम करू लागली. अवघी वीस – एकवीस वर्षांची, नाजूक, बोलके स्वप्नाळू डोळे, अजून अल्लड, पण समजूतदार. लग्नाला तीन वर्ष झाली हे ऐकून मी उडालेच होते.
अचानक झाडू हातातून खाली ठेऊन माझ्या समोर आली आणि म्हणाली, “काही कारण नसताना कोणी आपल्याशी अबोला धरला तर काय करायचं असतं, काकू??”
मी भुवया उंचावून तिच्याकडे फक्त बघितलं. “नाही, नवऱ्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण जवळची व्यक्ती आहे. काहीही भांडण नाही, वादविवाद नाहीत. आणि अचानक तिने माझ्याशी बोलणं बंद केलंय. मला त्रास होतो याचा. माझ्या डोक्यातून हे जातच नाही. मग कामाकडे दुर्लक्ष होतं, पोटात जळजळ होते, छातीत धडधड होते.
माझी काही चूक असेल तर तिने मला सांगावं ना! मी माफी मागीन तिची. पण ती समोर आली की तोंड फिरवून निघून जाते. खूप लागतं मला! ” ती श्वास घ्यायला थांबली.
मी म्हटलं, “बोलल्यावर बरं वाटतंय ना तुला? ती जी कोणी आहे ती तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे ना? मग हे माझ्याशी बोललीस तेच तिच्याशी बोल ना! तिचा हात धरून शेजारी बसव आणि विचार तिला हे सगळं. तुझी चूक आहे असं वाटलं तर “सॉरी” म्हणायला लाजू नकोस. आणि तुझी चूक नाही असं वाटलं तसं स्पष्ट सांग तिला. हे नातं तिच्यासाठीही तेवढंच महत्वाचं असेल तर समजेल तिला. नाहीतर तू ही काय ते समजून घे आणि या नात्यातून बाहेर पड!”
तिचा चेहरा एकदम खुलला. “आजच बोलते मी. हे मला का सुचलं नाही आधी? उगाच कुढत बसले!” पटकन उठून ती कामाला लागली. जाताना, येते काकू. थँक यू! म्हणाली आणि हसऱ्या चेहऱ्याने गेली.
पण मला विचारात टाकून गेली. जेमतेम शाळा शिकलेली ही मुलगी, एवढी भावनाशील, नात्यांचा विचार करणारी, नाती टिकवायची धडपड करणारी! ती जी कोणी समोरची व्यक्ती आहे, ती हिला समजून घेईल? हिची तगमग तिला समजेल?
हिला मी उपदेश केला, पण आपण काय करतो? इतकं सहज मन मोकळं करतो? “गेला उडत” म्हणत आपण किती सहज नाती बाजूला करतो. “मी” पणा ची भिंत उभी करून रक्ताची नाती, प्रेमाची नाती, मैत्रीची नाती.. सहज विसरतो. छोट्या छोट्या गोष्टी, नात्यात गैरसमज निर्माण करतात पण आपण त्या दूर करायचे कष्ट घेत नाही.
माहितीतलं उदाहरण आहे. आईवडील गेल्यावर, माझ्या मैत्रिणीने भावाशी संबंध तोडले. ती त्याचं नावही काढत नव्हती. कारण काय? हा आता आईवडिलांची सगळी इस्टेट ढापणार, मला जागा, दागिने, पैसे काहीही देणार नाही. हिने अचानक बोलणं सोडल्यावर भाऊही म्हणाला, गेली उडत! कारण काय हे दोघांनाही माहीत नाही, दोघांनीही गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला नाही. भाऊ आजारी पडला तेव्हा त्याने न राहवून एकदा हिला फोन केला आणि सांगितलं की “मी जायच्या आधी, तुझ्यासाठी आईने ठेवलेले दागिने घेऊन जा. ही जागा आईबाबांनी आपल्या दोघांच्या नावावर केली आहे. ती माझ्या पश्चात तुलाच मिळेल.” माझ्या मैत्रिणीला तोंड कुठे लपवावं ते कळेना.
“काय करू गं?” मला विचारलं. तिला म्हटलं, आधी स्वतःच्या तोंडात मारून घे. नंतर जाऊन भावाला sorry म्हण. आणि दागिने, पैसे, जागा घ्यायची की नाही हे तुझ्या मनाला विचारून ठरव. तिने ‘आईची आठवण’ म्हणून दागिने घेतले आणि जागा भावाला दिली. तिला तिचं माहेर परत मिळालं. तिच्या भावाने हात पुढे केला नसता तर?? भावाने बोलावूनही ही गेलीच नसती तर??
चार दिवस प्रेमाचे घालवूया की! मनापासून टिकावावसं वाटतं ते नातं टिकवायचा जरूर प्रयत्न करावा, नाहीतर नात्यालाही expiry date असतेच हे ध्यानात घेऊन पुढे चालावं!
बरोबर ना?
संध्या घोलप


Leave a Reply