एक आठवण, रेल्वे प्रवासाची

१९९४- ९५ च्या सुमारास, मी एकटीच सोलापूरला निघाले होते. त्या आधी व्हीटी ला जाऊन तीन तास रांगेत उभं राहून तिकीट काढलं होतं ( तेव्हा बोटाच्या क्लिक वर काही व्हायचं नाही) फर्स्ट क्लास, खालचा बर्थ मागून घेतला होता. ते रिझर्व्हेशन चे फॉर्म्स अजून आठवतात मला. अतिशय पातळ कागद, एका बाजूला लिहिलेलं मागच्या बाजूने पण दिसायचं.

सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री १०.३० च्या आसपास सुटायची. मी वेळेवर स्थानापन्न झाले.

गाडी सुटायला पाच मिनिटं असताना, माझ्या समोर एक प्रसिद्ध नेते येऊन बसले. नेते मंडळी ट्रेनने प्रवास करायचे हो तेव्हा. तरीही माझे डोळे आश्चर्याने विस्फारले! मी त्यांना ओळखलंय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या बरोबर आणखी दोघे सहप्रवासी होते. त्यांच्या आपापसात गप्पा सुरू झाल्या.

थोड्या वेळाने त्यांचा एक चेला अवतरला. (मला चमचा म्हणायचं नाहीये 😛)

माझ्याकडे अतिशय तुच्छ कटाक्ष टाकून म्हणाला, “ओ, उठा! “

मी मान वर करून त्यांच्याकडे बघितलं. तर नुसत्या बोटाने मला खूण करून सांगितलं, उठा आणि साईड च्या बर्थ वर जाऊन बसा. मी निवांत बसून राहिले.

तंबाखूचा तोबरा भरलेला असल्याने मान उंचावत, तोंडातला माल सावरत मला म्हणाले,” साहेबांचा बेड तयार करायचाय. तुम्ही तिकडे झोपा.”

माझ्या डोक्यात सणक गेली. मी समोर साहेबांकडे बघितलं. ते मुद्दाम लक्ष नाही असं दाखवत शेजाऱ्याशी बोलत होते.

मला वाशीहून व्हीटीला जाऊन तीन तास रांगेत उभं राहून तिकीट काढल्याची आठवण झाली.

मी त्यांना शांत शब्दात म्हटलं, “मी माझ्या पैशाने तिकीट काढून आले आहे. आणि तुमचे साहेबही आमच्याच पैशाने तिकीट काढून आले आहेत. मी का बर्थ बदलू?” 🤨

आता साहेबांना लक्ष घालावं लागलं. ते घाईघाईने म्हणाले, “मॅडम, तसं नाही हो. आम्ही तिघं बरोबर आहोत ना? समोरासमोर बसून बोलता येईल.”

“बोला ना! रात्रभर बोलणार नाही ना? झोपायची वेळ झाली की ते झोपतील त्यांच्या जागेवर. मी माझ्या पैश्याने.. “

“बरं बरं” त्यांनी माझं बोलणं अर्ध्यावर तोडलं. 🤣🤣

त्यांनी ओळखलं की ही बाई काही आपल्याला घाबरणारी वगैरे नाहीये.

मग लगेच “दिलजमाई” च्या विचाराने विचारलं, “काय करता आपण?”

“मी नुकताच govt job सोडला आहे. नाहीतर असं बोलायचं धाडस केलं नसतं.” मी हसतहसत म्हटलं. साहेब आणि त्यांचे मित्रही हसायला लागले.

“नाही हो, सत्ता आमच्या ताब्यात नाहीये ना!”

“हो ना, नाहीतर मला चंद्रपूरला च पाठवलं असतं तुम्ही!” त्या वेळेला चंद्रपूरला बदली म्हणजे काळया पाण्याची शिक्षा समजली जायची.

” कोणत्या डिपार्टमेंट ला होता आपण?”

असं “आपण” वगैरे ऐकायची सवय नसते आपल्याला.

“मी टाऊन प्लॅनिंगला होते. आर्किटेक्ट आहे”

“अरेवा! आपल्यासारख्या माणसांची गरज आहे शासनाला.”

“तसा पगार देतात का पण आम्हाला?

तुमचं एक महिन्याचे वेतन आणि भत्ता, माझ्या वर्षभराचा पगार आणि बोनस पेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल! “

” मॅडम, आपण हुशार दिसताय. उगाच नोकरी सोडलीत. परत यायचा विचार आहे का? मी बघतो काहीतरी.”

मी थोडी सावध झाले. शेवटी बोलून चालून राजकारणी. उगाच काही गोड बोलणार नाहीत. आपण आपलं झोपावं हे बरं.

सकाळी सोलापूर आल्यावर, प्लॅटफॉर्मवर हारतुरे हातात घेतलेल्या लोकांची खूप गर्दी दिसली.

मी गुपचुप दुसऱ्या बोगीत गेले आणि तिथल्या दाराने खाली उतरले.

आज ही आठवण आली आणि वाटलं की तेव्हा सोशल मीडिया असता तर “त्यांच्या पक्षाच्या” लोकांनी बहुतेक मला हाणलं असतं, घरावर मोर्चा आणला असता, कदाचित “अपमान” केला म्हणून पोलिस कंप्लेंट पण केली असती!

नंतर जवळजवळ वीस वर्षांनी, अहमदाबाद हून विमानाने मुंबईला येणार होते. संध्याकाळी ७ वाजता फ्लाईट होती म्हणून चार वाजताच विमानतळावर जाऊन पोहोचले होते. सात वाजत आले तसे फ्लाईट लेट आहे असं सांगण्यात आलं. आधी एक तास, मग दोन तास, मग तीन तास! कारण काहीच सांगत नव्हते. अचानक सिक्युरिटीच्या गराड्यात, एक अभिनेता, (जे MP होते) हसतहसत आले आणि विमानात बसायला गेले. ते गेल्यावर, आम्हाला आत सोडलं. सगळे प्रवासी चिडून कुजबुजायला लागले की हे कारण होतं काय? त्यांच्यासाठी आम्हाला तीन तास उशीर केला? पण बोलणार कोणाला?

आम्ही विमानात प्रवेश केला तेव्हा हे महाशय, ब्लाइंडफोल्ड लाऊन झोपून पण गेले होते! 😡

खरं तर आठ तासात ट्रेन सुद्धा अहमदाबाद हून मुंबईला पोहोचते! सात वाजताची फ्लाईट साडेआठ वाजता मुंबईत पोहोचून, मी दहा वाजता घरी पोहोचणार होते, ती रात्री दीड वाजता, जीव मुठीत धरून, एकटी, टॅक्सीने घरी पोहोचले! पण त्या MP ला काहीही बोलले नाही!! 😀

बापरे बापरे! बरं झालं, आता मी तेवढा प्रवास करत नाही आणि प्रवास केला तरी गप्प बसते!! 🤐😀

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading