कान द्या !!

माळ पदक विठ्ठल

विसरला भक्ताघरी

आला आळ जनी वरी

केली पदकाची चोरी!!

जनी म्हणे पांडुरंगा

वृथा आळ माझ्यावरी

नाही आम्ही जगी केली

तुझ्या पदकाची चोरी!!

तोच धावला श्रीहरी

पांडुरंग जगजेठी

झाले पाणी सुळाचे गं

धन्य जनी धन्य हरी!!

माणिक ताईंनी गायलेला हा सुंदर अभंग आज ऐकला आणि डोळे वहायला लागले.

वैष्णवी डोळ्यासमोर उभी राहिली. जनी नी धावा केल्यावर, विठोबा माऊली धाऊन आली आणि सुळाचं पाणी झालं! जनी वाचली!

वैष्णवीने का नाही धावा केला? तिची विठुमाउली का नाही धाऊन गेली?

आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा पर्याय कसा असू शकतो? यात मी पुरुष – स्त्री असा भेद करत नाही. कोणीही, अत्याचार झाल्यामुळे, आर्थिक अडचणीमुळे, नैराश्याने किंवा कोणत्याही कारणाने, स्वतःचा जीव का संपवावा? मागे राहिलेल्यांचा विचार न करता?

मला वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक एक विठू माऊली असतेच. ती कोणत्या रूपात आहे ते आपण ओळखायचं असतं. आई वडील, भाऊ बहीण, जवळचा नातेवाईक, मित्र मैत्रीण …. कोणीतरी असतच. आपण हात पुढे केला तर सावरणारं, आपलं बोलणं शांतपणे ऐकून घेणारं, आपल्याला योग्य तो सल्ला देणारं, आपली मनापासून काळजी करणारं !

शोधा त्या विठू माऊलीला आणि करा हात पुढे. आतल्या आत असं विझू नका, जाळून घेऊ नका. वैष्णवी कोणाशीही बोलली असती तर तिच्या विठू माऊलीने कदाचित तिच्या मनातला आत्महत्येचा विचार, “सुळाचे पाणी झाले” तसा विरघळवून टाकला असता आणि आज ते दहा महिन्याचं बाळ आपल्या आईच्या कुशीत निवांत पहुडलं असतं.

एका कोर्स मध्ये आम्हाला सांगितलं होतं की आपल्या जवळ, किमान सहा कान पाहिजेत. जे आपलं बोलणं ऐकून घेतील आणि स्वतःजवळच ठेवतील.पुन्हा तोंडावाटे बाहेर काढणार नाहीत. स्त्रिया नेहमी कुढत राहतात, स्वतःला त्रास करून घेतात असं म्हटलं जातं. अशा काही गोष्टी असतात ज्या आपण घरातल्या माणसांजवळ बोलू शकत नाही, मैत्रिणी बरोबरही शेअर करू शकत नाही. (कारण गॉसिप ची भिती वाटते) त्या गोष्टी कदाचित अनोळखी व्यक्तीला सांगू शकतो.

या आधीही मी हे लिहिलं होतं की माझे कान उपलब्ध आहेत, कोणासाठीही…

एकमेकांना न बघितल्यामुळे आपण जास्त मनमोकळेपणाने बोलू शकतो असं वाटतं.

माझी पोस्ट वाचून, मला अनोळख्या महिलांचे दिवसाला तीन चार फोन यायला लागले. मी कधी नाव विचारलं नाही, कुठून बोलताय ते विचारलं नाही. आणि त्यांची मनं मोकळी झाली! कारण त्यांना खात्री होती की ज्या बाईने आपल्याला बघितलं नाहीये, ती कोणाला काय सांगणार? आपलं मनोगत गुपित राहणार हे नक्की.

आपल्या घरात, सुरक्षित चार भिंतींच्या आत बसलेल्या मला, असे काही प्रॉब्लेम असू शकतात याची जाणीव ही नव्हती.

मी काही तज्ञ नाही, मी कोणताही सल्ला देत नाही, मी फक्त माझे कान देते!

तुम्हीही शोधून काढा तुमचे कान!

बोला, मोकळं व्हा, फायदा वाटलाच तर तुम्हीही इतरांना तुमचे कान द्या!

समाजाला गरज आहे आज — कानांची!

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading