आजकाल एक गोष्ट सहज वाचायला मिळते. ती म्हणजे वृद्धांनी केलेल्या तरुण पिढीबद्दलच्या तक्रारी आणि तरुणांनी केलेल्या ज्येष्ठांच्या तक्रारी.
आपापल्या जागी प्रत्येक जण बरोबर असतो. काळ बदलला तरी आपल्या सवयी, विचार, संस्कार तेच राहिले आणि आपण तरुण असताना जसे वागलो तसेच आता तरुण पिढीने आपल्याशी वागावे असा विचार आपण करतो. आणि म्हणूनच नाईलाजास्तव वृद्धाश्रमात ठेवावे लागल्यास , नातेवाईक आणि परिचितांकडून तरुण पिढीलाच बोल लावला जातो. अगदी स्वतःहून वृद्धाश्रमात राहायला गेले असले तरी दोष तरुणांना!
ही सगळी चर्चा बाजूला ठेवली तर आपण स्वतः कडे निःपक्षपाती राहून बघू शकतो का? आपण रोजच्या आयुष्यात, आपल्या सवयी बदलल्या आहेत का, हट्टी, दुराग्रही झालो आहोत का, हे जरा तपासून पाहणे आवश्यक झालं आहे असं वाटतं.
नुकताच एका ज्येष्ठ जोडप्याला भेटण्याचा योग आला. त्यातली बायको खूप दमलेली दिसत होती. काय झालं? या प्रश्नावर त्या भडाभडा बोलायला लागल्या.
“अहो, यांना वाटतं की मी अजून तरुणच आहे. यांचच फक्त वय झालंय. मला रोज सकाळी आठ वाजता अंघोळ करायची असते त्या आधी पाणी गरम झालेलं पाहिजे, ९ वाजता नाश्ता तयार पाहिजे, एक वाजता जेवण पाहिजे, दुपारचा चहा चार वाजताच पाहिजे. संपतच नाही यांचं. मी थकून जाते हो. पण यांच्या लक्षातही येत नाही.”
तर दुसरी एक सून, सासूबाईंच्या देखतच म्हणाली की ‘ तुला अजून “आमच्यासारखा” स्वयंपाक येत नाही’ हे मी माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली तरी रोज ऐकते आहे!
अश्या दुसऱ्यांना त्रासदायक सवयी असतील तर कुटुंबातली जवळची माणसं पण कंटाळतील ना?
१) मला अमुक पदार्थ अस्साच लागतो
२) माझं वेळापत्रक मी पाळणारच
३) मला ऐकायला कमी येतं पण मी मशीन वापरणार नाही (आणि टीव्ही मोठ्या आवाजात लावणार!)
४) मी काठी घेणार नाही/ मी कोणाची मदत घेणार नाही / मी या जन्मात डायपर वापरणार नाही/ मी अमुक भाज्या खाणार नाही/मला पोळी गरमच लागते
५) मला पंखा चालत नाही पण मी स्वेटर वापरणार नाही, तुम्ही पंखा लाऊ नका!
६) मी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत. म्हणून मी अनाहूत सल्ला देणारच.
एवढे नियम बघायला मिळतात की आश्चर्य वाटतं. यात स्त्री/पुरुष असा भेद नाही! नियम सगळ्यांचे असतात, पण वेगवेगळे असतात.
एक गंमत आठवली. तेव्हा मी ज्येष्ठ वर्गात गेले नव्हते. अचानक एक ज्येष्ठ जोडपं घरी जेवायला आलं. ‘ पालकची पातळ भाजी मी खात नाही, कोशिंबीर मला दही घालून आवडत नाही, वांग्याचं भरीत खाल्लं की मला त्रास होतो, भात फक्त इंद्रायणीचाच लागतो!’ बरं, नवऱ्याबरोबर राहून राहून बिचाऱ्या बायकोच्या आवडीनिवडीही बदलल्या होत्या पण त्या बिचाऱ्या जे होतं ते खात होत्या. मला त्यांना पानात काय वाढायचं तेच कळेना. त्यांनी वाटीत दही मागून घेतलं आणि दही साखर पोळी खाल्ली! ![]()
आपली आवड निवड आपण लोकांकडे गेल्यावरही बाजूला ठेऊ शकत नाही??
याला दुराग्रही म्हटलं तरी आवडत नाही.
‘ आता इतक्या वर्षांच्या सवयी बदलणार आहेत का? तरुणांनीच समजून घेतलं पाहिजे’ हा त्यावर खुलासा!
हे मी स्वतः ज्येष्ठ असून लिहिते आहे. कसं वागायचं नाही ते आपण “तरुण ज्येष्ठांनी ” शिकलं पाहिजे असं मला वाटतं.
कालच Father’s day चे मेसेजेस येत असताना मधेच एक पेपर मधला लेख वाचायला मिळाला ” पालकांना सोडून देऊ नका, नाहीतर….”
कायद्याने (जबरदस्तीने) पालकांना सांभाळायला लागण्याची आपली संस्कृती नाही. पण आपण बदललो नाही तर मुलं आपल्याला “ditch” करायला मागेपुढे पाहणार नाहीत हे नक्की.
या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणून मी हा कदाचित एकतर्फी वाटणारा लेख लिहिला आहे. चर्चेचं स्वागत आहे. ![]()
संध्या घोलप


Leave a Reply