मदभरी ये हवायें

महाराष्ट्र टाइम्स मध्ये ‘ गुणगुणावेसे वाटणारे गीत’ असं एक सदर असतं. त्यात कोणीतरी “मदभरी ये हवायें” हे लताबाईंचं गाणं लिहिलं होतं. मला एकदम कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. ‘ अनोखा दान’ नावाचा असित सेन दिग्दर्शित सिनेमा १९७२- ७३ च्या सुमारास प्रदर्शित झाला असावा. तेव्हा मी शाळेत होते आणि जाऊन कोणताही सिनेमा बघायचा अशी घरी पद्धत नव्हती. त्यात अनिल धवन आणि झाहिरा ही जोडी! त्यामुळे तसाही उत्साह असायचं काही कारण नव्हतं.

पण गाण्याची प्रचंड आवड, त्यामुळे रेडिओ सतत चालू असायचा. हे गाणं ऐकलं आणि खूप आवडलं. सलील चौधरींचं संगीत, गुलजारचे शब्द आणि लता!

तेव्हा रेडिओवर एक कार्यक्रम लागायचा. रागानुसार हिंदी सिनेमातली गाणी लावायचे. त्यात रागाचं चलन, आरोह अवरोह अशी माहितीही द्यायचे. माझ्या भावाने एक वही केली होती. आणि तो त्यात रागानुसार गाणी लिहून ठेवायचा. त्यामुळे गाणं आवडलं की त्याचा राग शोधायचा याची मलाही आवड निर्माण झाली.

“मदभरी ” गाणं भैरवी रागावर आधारित आहे. भैरवी राग साधारणपणे भक्ती संगीत किंवा उदास गाण्यांसाठी प्रसिद्ध! अगदी सैगल यांचं “बाबुल मोरा” हे १९३८ सालातलं गाणं घ्या किंवा दुनिया ना भाये मोहे अब तो बुला ले , धन्य भाग सेवा का अवसर पाया.

उदास गाणी तर चिक्कार आहेत. तुम्हारे भुलानेको जी चाहता है, तूने हाये मेरे जख्मे जिगर को , तू प्यार करे या ठुकराये, तेरे सब ग़म मिले मुझको, कदर जाने ना, हम हैं मता-ए कुचा, दिलका खिलौना हाये टूट गया, है इसीमें प्यारकी आबरू अशी कितीतरी अप्रतिम गाणी या रागावर आधारित आहेत. १९५६ सालातलं सी रामचंद्र यांनी संगीत दिलेलं ” कैसे आऊं जमुना के तीर” यातला लताबाईंचा आवाज आणि १९७२ सालातल “मदभरी ये हवायें” यातला आवाज, यातही खूप फरक आहे.

उदास आणि संथ गाण्यांमध्ये, मुकेश यांचे मुझको इस रात की तनहाई में आवाज़ न दो तर फास्ट गाण्यांमध्ये नाचे मन मोरा, फुल गेंदवा ना मारो, ए मेरे दिल कहीं और चल, सावरे सावरे ही परत परत ऐकाविशी वाटणारी गाणी येतात.

गंमत आहे ना? ५०-६० च्या दशकानंतर, मदभरी ये हवायें मला डायरेक्ट ८० च्या दशकात घेऊन गेलं!

गुलजार यांचे शब्दही किती लोभस आहेत!

मैंने रातोंसे कर ली दोस्ती, तारोंके लिये

और चुराके लिया, मैंने ये दिन बहारोंके लिये

ए जमीं आसमां, मुझको दे दुवाएं !

या गाण्यातल्या स्वरांच्या रोलर कोस्टर मुळे, मला हे गाणं म्हणायला ही खूप आवडायचं! कॉलेजमध्ये गेल्यावर तर गाण्याची वही होती, त्यात आवडती गाणी लिहायची आणि म्हणत बसायची — स्वांत सुखाय! 🤣🤭

एका गाण्यामुळे, आज कित्ती सुंदर गाणी आठवली! आपण सगळेच, त्या सगळ्या संगीतकारांचे, गायकांचे कायमच ऋणी राहू!

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading