बरीच वर्ष पुण्यात राहूनही, मला तांबट आळी माहीत नव्हती. कसबा पेठ माहिती, तिथलं प्रसिद्ध गणपती मंदिर, जवळच लाल महाल, तिथल्याच नाक्यावरून मुलांना ३५ वर्षांपूर्वी सायकल विकत घेतली होती.
तांबट आळी, शिंपी आळी, पलीकडे तपकीर गल्ली ही नावं माहित होती. पण तांबट आळी मधे तांब्याचा कारखाना आहे आणि तिथे अजूनही हाताने भांड्यांना ठोके पाडले जातात, polishing, lacquer coating केलं जातं हे माहित नव्हतं.
The Western Routes मुळे तांबट आळी walk ला जायची संधी मिळाली. शनिवार वाड्यासमोर एकत्र जमून वॉकला सुरुवात झाली. त्वष्टा कासार समाजाने बांधलेलं महालक्ष्मीचे देऊळ पाहून, तांबट आळी वर्कशॉप बघायला गेलो. चकचकीत पॉलिश करून ठेवलेली तांब्याची भांडी, ठोके पाडण्यासाठी सतत चालणारे हात, साच्यामधे लाख वापरून तयार केलेल्या रेखीव तसबिरी, मोदकपात्र, पाण्याच्या बाटल्या, तांब्या भांडी, सगळं बघून थक्क झाले. मशिनवर कितीही कामं होऊ देत, भांड्याला ठोके हातानेच पाडायला लागतात. पाण्याचा बंब बघून बालपण आठवलं.
“आनंदी संसार” हे श्री गिरीश पोटफोडे यांनी थाटलेलं copper museum बघायलाच पाहिजे इतकं सुंदर आहे. हा त्यांचा स्वतःचा संग्रह आहे. आणि दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या वस्तू इथे १०× १० च्या खोलीत निगुतीने मांडून ठेवल्या आहेत.
तिथेच जवळ पेशवे काळापासून असलेलं नृसिंहाचं देऊळही बघितलं. त्यातली लाकडी कलाकुसर खास बघण्या सारखी आहे.
चालून थकल्यावर चहा ब्रेक हवाच. तिथल्या पुणेरी पाट्यांचे फोटोही हवेत. ![]()
अशा ग्रुप वॉक मुळे खूप माहिती मिळते. आपल्याच शहराची आपल्याला नव्याने ओळख होते.
Thank you The Western Routes!
संध्या घोलप





Leave a Reply