गोव्यात जाऊन फक्त beaches बघून किंवा देवळात जाऊन येणारे लोक आहेत.
पण गोव्याची संस्कृती, वारसा, इतिहास पहायचा असेल तर MOG म्हणजे MUSEUM OF GOA आणि MUSEUM OF HOUSES ही दोन म्युझियम तरी बघायला हवीत.
१) MOG – museum of Goa मला आवडतं. मी आधी बघितलं होतं तरी परत जावंसं वाटलं. श्री सुबोध केरकर या कलाकाराने उभं केलेलं हे म्युझियम आपल्याला त्यांच्या कलाकृतीतून समुद्रावर घेऊन जातं. शंख, शिंपले, कवड्या, नारळाच्या करवंट्या, जुन्या बोटी, होड्या यांनी साकारलेली शिल्पे, चित्रे तर आहेतच. फोटो आहेत, पेंटिंग्ज आहेत. तीन मजले एक एक कलाकृती बघताना वेळ कसा जातो कळत नाही. इमारतीच्या मागच्या बाजूला जे अंगण आहे, तिथे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरून अप्रतिम भिंत तयार केली आहे. जवळ गेल्यावरच समजतं की टाकून दिलेल्या कचऱ्यापासून ही भिंत उभी आहे.
नक्की बघावं असं हे संग्रहालय Pilerne इंडस्ट्रीयल इस्टेट मधे आहे.
२) HOUSES OF GOA – आर्किटेक्ट Gerard de Cunha यांनी जहाजाच्या आकारात उभी केलेली ही छोटीशी इमारत. रस्त्याच्या मधोमध असल्याने आता ती इमारत ट्रॅफिक आयलंड झाली आहे. स्थानिक मटेरियल वापरून वास्तू उभारायची हे Gerard यांचं वैशिष्ट्य आहे.
तीन मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर प्रसिद्ध कलाकार Mario Miranda यांची sketches आणि paintings आहेत. तिथल्या सोव्हेनियर शॉप मधे सुद्धा मारिओ यांच्या कलाकृती मिळतात.
दुसऱ्या मजल्यावर पोर्तुगीज घरांपासून आजपर्यंत झालेले बदल, घरापुढे दिसणारी तुळशी वृंदावने, बाल्कनी चे विविध प्रकार, वापरलेली ग्रील्स, हॅट हँगर, खूप काही बघायला मिळतं.
गेरार्ड यांच्या पत्नीने सुरू केलेली शाळा – Nisha’s play school – शेजारीच आहे. त्याचं design अर्थात गेरार्ड याचंच आहे.
Eco friendly construction techniques वापरून ही शाळा उभी राहिली आहे. हवा, सूर्यप्रकाश, वारा यांचा विचार केल्याने मुलांना मोकळेपणा वाटेल अशी रचना आहे. त्याच आवारात, गेरार्ड यांचा अप्रतिम बंगला आहे. Museum च्या तिसऱ्या मजल्यावरून त्या बंगल्याचं दर्शन होतं आणि हे घर पण आतून बघायला मिळायला हवं असं वाटत राहतं.
Museums बघण्या आधी आम्ही आसागाव इथे असलेल्या Mojigaon eco restaurant मध्ये ब्रेकफास्ट केला.
गोव्याचे रस्ते इतके छान, प्रशस्त, गुळगुळीत आहेत की आमच्या रहायच्या ठिकाणापासून सगळं लांब असूनही प्रवास जाणवत नव्हता. असे रस्ते मुंबई पुण्यात का होऊ शकत नाहीत असं राहून राहून मनात येत होतं.
बाकी हेरिटेज होम्स बद्दल पुढच्या पोस्ट मध्ये!
संध्या घोलप





Leave a Reply