श्रीलंका

“रम्य ही स्वर्गाहून लंका” हे पं. भीमसेन जोशी यांचं गाणं लहानपणापासून ऐकलेलं. पण लंका बघायची संधी या “बालवयात” मिळाली.

श्रीलंकेचं एक टोक आपल्या धनुष्कोडी पासून अवघ्या ३२ नॉटिकल माईल्स वर आहे. त्यामुळे भाषा, माणसं, रस्ते, इमारती यात खूपच साम्य आहे. केरळला जा, मुन्नार, उटीला जा. तसंच सौंदर्य, तशीच हिरवीगार झाडं, तोच निसर्ग पहायला मिळतो.

तरीही श्रीलंका खूप खूप आवडलं. त्याचं कारण? स्वच्छता! हो, तिथले नागरिक कुठेही रस्त्यावर कचरा टाकताना दिसले नाहीत, पानाच्या पिचकाऱ्या नाहीत, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या खूप वापरतात पण तरीही त्या इतस्ततः साचलेल्या दिसत नाहीत.

कोलंबोच्या मुख्य रस्त्यावर सुद्धा एकही “होर्डिंग” नाही याचं मला फारच आश्चर्य वाटलं. आमच्या लोकल गाईडने कारण सांगितलं की आम्ही तुमच्यासारखे “सिनेमा वेडे किंवा क्रिकेट वेडे” नाही. आमचे नट नट्या, खेळाडू रस्त्यात दिसले तरी आम्ही गर्दी करत नाही, ते जिथे राहतात तिथे त्यांच्या घरासमोर जाऊन उभे राहत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या जाहिराती तुम्हाला दिसणार नाहीत.

श्रीलंकेवर जे आर्थिक संकट आलं होतं त्यातून श्रीलंका आता सावरते आहे. तिथला माणूस (दुकानातला सेल्समन असो किंवा हॉटेलमधला वेटर असो) पर्यटकांशी चांगलाच वागणार, बोलणार. मदत करायला तत्पर असणार. आमच्या बसचा ड्रायव्हर आणि क्लिनर हसतमुख, मितभाषी, येईल तेवढं हिंदी बोलायचा प्रयत्न करणारे होते.

“श्रीलंका महिला पर्यटकांसाठी अगदी सेफ आहे, तुम्ही कुठेही एकट्या फिरा, काही काळजी करू नका” असं आश्वासन आम्हाला पहिल्या दिवशी आमच्या गाईडने दिलं आणि आम्ही ते अनुभवत होतो.

माझ्या मनात राहून राहून आपल्या देशाची तुलना येत होती. आम्ही परदेशी पर्यटकांना असा विश्वास देऊ शकतो? अशी स्वच्छता ठेऊ शकतो?

तिथली आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही. तरीही रस्त्यावर भिकारी, बेवारशी दिसले नाहीत. निदान पर्यटन स्थळांवर तरी ही काळजी घेतलेली दिसली.

आपण काही बोध घेऊ शकतो??

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading