II तू धैर्याची असशी मूर्ती , माझे वहिनी, माझी स्फूर्ती II
गेल्या आठवड्यात “अथश्रीत” एक अप्रतिम कार्यक्रम पाहण्याचे भाग्य लाभले.
“मी… येसू वहिनी” !
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या मातृतुल्य वहिनी येसूवहिनी यांच्यातील भावबंध उलगडून दाखवणारा कार्यक्रम!
सावरकर घराण्यात, बाबाराव आणि तात्याराव हे दोघेच देशभक्त होते का? तर अजिबात नाही. येसू वहिनी, माई यांच्या देशभक्तीची आपण कल्पनाही करू शकत नाही. सर्व घरदार, राष्ट्राला अर्पण करणारे हे कुटुंब एकमेकांचा आधार होते. सगळी दुःख झेलत त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते.
तात्यारावांना आईची माया देणाऱ्या आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या येसूवहिनी, त्यांचे विचार, त्यांची घालमेल जाणवून घ्यायची असेल तर “मी… येसूवहिनी” हा कार्यक्रम निश्चित बघायला हवा.
समिधा या संस्थेतर्फे सादर होणारा हा कार्यक्रम श्री दिलीप ठोसर Dilip Thosar आणि त्यांच्या सुरेल पत्नी संगीता ठोसर Sangeeta Thosar
यांच्या कल्पनेतून साकार झालेला, डॉ चित्रलेखा पुरंदरे यांनी इतिहास पूर्णपणे अभ्यासून संहिता लिहिलेला.
वीणा गोखले या केवळ आपल्या आवाजाच्या चढ उतारातून येसूवहिनीच्या सगळ्या भावना, करारीपणा अशा तऱ्हेने दाखवून देतात की येसूवहिनी आपल्या आसपास आहेत असा भास होतो.
संजय गोखले आणि विनोद पावशे आपल्यापर्यंत तात्याराव आणि बाबाराव अचूकपणे पोहोचवतात.
संगीता ठोसर यांनी “ने मजसी ने” ज्या पोट तिडीकीने म्हटले त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
हे अभिवाचन आहे, नाटक नाही. कुठलाही सेट नाही, मेकअप नाही, भाषणे नाहीत, सत्कार नाहीत. तरीही मनाला भिडणारा आणि मनात रेंगाळणारा कार्यक्रम सादर केल्याबद्दल, समिधा संस्थेचे आभार.
पुण्यात हा कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा तो आवर्जून बघावा ही पुणेकरांना नम्र विनंती! ![]()
![]()
संध्या घोलप


Leave a Reply