Letting go…

जुने जाऊद्या मरणा लागुनी

जाळून किंवा पुरूनी टाका

परवा सौरभ बोथराच्या क्लास मधे त्यांनी मेडिटेशन चालू असताना, “Letting go” म्हणजे काय याची कल्पना दिली. ( ही कल्पना पण सौरभ सरांची. मेडिटेशन “करायचं” नसतं, ते होत असतं, आपणहून व्हावं लागतं)

या वर्षाची सांगता होत असताना आणि नवीन वर्षाची सुरुवात होत असताना, स्वच्छ मनाने, स्वच्छ विचाराने, स्वच्छ दृष्टीने पुढील वर्षाचे स्वागत करता यावे यासाठी let it go — जाऊ द्या, सोडून द्या हे अंगिकारता आलं पाहिजे असा त्याचा अर्थ.

शांतपणे डोळे मिटून, पाठीवर झोपलो होतो. सौरभ सरांचा शांत आवाज ऐकू येत होता. “Let go of all the efforts, all the negative emotions, greed, anger, fear, jealousy…

Imagine all of them going out…

Let go of all the desires and wants

Let go.of all the perfection that we aim for, your expectations from yourself, the expectations from others…

खरच, किती गोष्टी मनात साठवलेल्या असतात आपण! घरातल्या जुन्या झालेल्या गोष्टी, माळ्यावर टाकून देतो तितक्याच सहजपणे मनाच्या माळ्यावर या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. स्वतः कडून अपेक्षा, दुसऱ्याकडून अपेक्षा, स्वतःच्या चुकांसाठी स्वतःला दोष देत राहणं किंवा समोरच्याने चूक केली तर आयुष्यभर ती लक्षात ठेऊन, त्या व्यक्तीला माफ न करणं…

दिवस जातात, वर्ष जातात तश्या भावना, प्रसंग, माणसं सगळच बदलत जातं. पण आपण तो विचार न करता, सगळं धरून ठेवतो!

विपश्यनेत पण गुरुजी सांगतात की एखादा माणूस येतो आणि काहीतरी बोलून निघून जातो. आपण म्हणतो की “मैं ये जिंदगीभर नहीं भुलूंगा! “

“तो मत भुलो! पकडके रखो! परेशानी किसको होगी? वो तो चला गया! तुम ऐसी बाते पकडके रखोगे तो नुकसान तुम्हाराही होगा! “

“Do not try to hold on to situations, things, people, even the results and the outcome. “

सगळं कळत असतं पण वळत नसतं 😀

जमेल एवढं करायला? आपल्या शरीरातला “माळा” साफ करायला? नवीन वर्षाची सुरुवात नव्या उमेदीने करायला?

“जुने जाऊद्या मरणा लागुनी

जाळून अथवा पुरुनी टाका”

असं कविवर्य केशवसुतांनी आपल्याला किती वर्षांपूर्वी सांगितलं आहे.

त्यांनीच सांगितलेल्या “सावध ऐका पुढल्या हाका”

त्यांचा संदर्भ वेगळा होता. आपल्याला ऐकू येणाऱ्या हाका असतील वाढलेलं बीपी, शुगर, कोलस्टोरॉल आणि काय काय…

निदान आपल्या मनातल्या नकारात्मक भावना —- राग, लोभ, द्वेष, भीती आणि सर्वात महत्वाचे अहंकार, ताठा, गुर्मी या सगळ्याला बाहेरचा रस्ता दाखवूया! स्वतःला आणि इतरांना सहज माफ करून टाकूया!

खूप मोकळं वाटेल.

प्रयत्न करून बघा!

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading