आपल्या आजुबाजूला काय चाललं आहे, याचा आपल्याला ढिम्म फरक पडत नाही. आपलं आयुष्य सुखात चाललं आहे ना? आपली मुलं बाळं चांगले मार्क्स मिळवतायत ना? आपल्या कंपनीत आपल्याला प्रमोशन मिळतं आहे ना? आपली गाडी रस्त्यावर अपघात न होता व्यवस्थित धावते आहे ना??
मग झालं तर! बाकी जगात काहीही का होईना, आपल्याला काय करायचंय?
मतदानाच्या दिवशी आरामात सुट्टी घालवावी. कोणीही निवडून आलं तरी आपल्याला काय फरक पडतो??
तरुण मुलांनी दारू पिऊन गाडी चालवत, रस्त्यावर झोपणाऱ्या तिघांना उडवलं.
आपल्याला काय फरक पडतो?
हॉस्टेल मधे किंवा टॅक्सीत किंवा आणखी कुठे… तरुण मुलीवर, विद्यार्थिनीवर, लहान अजाण बालिकेवर बलात्कार झाला… आपणे शूं फरक पडे छे??
भर रस्त्यात सुरे, काठ्या लाठ्या घेऊन मारामारी चालली आहे आणि आपल्या डोळ्यादेखत रक्तबंबाळ झालेला माणूस रस्त्यावर आडवा पडला आहे… की फरक पेंदी??
एकूणच काय… जगात कुठेही लढाई होऊ दे, त्सुनामी येऊ दे, भूकंप होऊ दे… आपण हळहळत सुद्धा नाही!!
कारण आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही
आज सकाळपासून एक बातमी वाचून खूप बेचैन झाले म्हणून ही भडास…
सहा वर्षाचा मुंबईचा मुलगा धीर संगनेरिया, जयपूरला आपल्या आजी आजोबांना भेटायला गेला. वडिलांबरोबर गाडीतून फिरायला गेला.
आणि पतंगाच्या मांजामुळे त्याचा गळा चिरून तो गतप्राण झाला!!! ![]()
![]()
बातमी वाचून मला पुढे जाताच येईना!
सहा वर्षाचं लेकरू! त्याला पतंग, मांजा माहित तरी असेल का? एवढं रक्त त्याने कधी पाहिलं असेल का? मृत्यू म्हणजे काय हे माहित असेल का? हे सगळं समजायच्या आधीच तो दुसऱ्याच्या हौसेपायी गेला?? ![]()
![]()
प्रत्येक संक्रांतीच्या आधी पोलिसांकडून सूचना येते की चायनीज मांज्यावर किंवा काचेची खर वापरून केलेल्या मांज्यावर बंदी आहे. आपल्याला काय फरक पडतो?
केवळ पैसा कमवायचा म्हणून अवैध रित्या हा मांजा विकणाऱ्याला ही फरक पडत नाही आणि स्वतःच्या हौसेसाठी विकत घेणाऱ्यालाही फरक पडत नाही.
मकर संक्रांतीपासून फक्त जयपूर मध्ये तीन जणांना मांज्यामुळे आपला जीव गमवावा लागला आणि १५० लोक जखमी झाले!! विचार करा — फक्त जयपूर मधले आकडे आहेत हे.
मुंबईत ४५ वर्षांचे भारत कदम दुपारी जेवून, मोटारसायकल वर बाहेर पडले. आणि फ्लायओव्हर वर अडकून बसलेल्या मांज्याने त्यांचा गळा कापला गेला.
का आपल्याला दुसऱ्याच्या जिवाची पर्वा नाही?? आपला खेळ होतो पण दुसऱ्याचा जीव जातो आणि आपल्याला काहीही फरक पडत नाही??
पुढच्या वर्षी… त्याच्या पुढच्या वर्षी.. आणि नंतर कितीतरी वर्ष हेच होत राहणार. मांज्यावर बंदी येणार, तरीही आपण तो वापरणार आणि पतंग उडवणार आणि दुसऱ्याच्या जीवाशी खेळणार.
काय फरक पडतो??
रोज मर्रा की जिंदगीमें ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती हैं! ![]()
![]()
संध्या घोलप


Leave a Reply