आज सकाळी सकाळी गंमत झाली. सौरभ बोथराच्या क्लास मधे breathing आणि मेडिटेशन चा दिवस.
“सिर्फ अपने मनकी आवाज सुनिये! शरीरको ढिला छोड दिजीये” मी सुद्धा मन लावून मेडिटेशन करत होते. तेवढ्यात बाहेर “आलू पराठा ssss” अशी अथश्री च्या कॅन्टीनवाल्याची हाळी ऐकू आली. ते कानावर पडणार नाही असं कसं होईल!! ![]()
मी कॅन्टीन मधून शक्यतो काही घेत नाही. पण आज आलू पराठा खायची हुक्की आली. (या वयात डोहाळे लागले कसं म्हणणार?
)
क्लास संपेपर्यंत धीर काढला. दोन उकडलेले बटाटे फ्रीज मध्ये आहेत याची मेडिटेशन चालू असतानाही मनाने नोंद घेतली होती.
दोन बटाटे? याचे आलू पराठे कसे करणार? मग ते लगेच किसले. त्यातच कणिक, थोडं बेसन, तिखट, मीठ, आमचूर पावडर, कोथिंबीर, आमिल पेस्ट (आलं मिरची लसूण पेस्ट) इवलसं तेल, ओवा घालून मळलं. दहाच मिनिटं कणिक मुरू दिली.
लाटताना, आपण stuff पराठ्यांना जशी वाटी करतो तशीच वाटी करायची पण काहीही stuff न करता, उंडा गोल करायचा आणि पोळी लाटायची. थोडक्यात काय तर कणकेला फसवायचं की तुझा stuff पराठा करते आहे! टम्म फुगून मऊसूत पराठा तयार झाला. करता करताच एक पराठा,कडेला ताटलीत घेऊन खाऊन टाकला. आणि मन शांत झालं.![]()
मैत्रीण म्हणाली, अगं काय हे? ज्यांना आलू पराठे येत नाहीत त्यांच्यासाठी आहे हे. तू का असे केलेस? तिला म्हटलं, आज माझं “फास्ट फूड” झालं.
संध्या घोलप


Leave a Reply