काल आमच्या अथश्रीत, आमच्या “स्मरणवेध” मंडळातर्फे एक सुंदर कार्यक्रम झाला. मन मस्तिष्क च्या Gauri Natu आणि संगीता जोशी यांनी एक तासभर आमची “ज्येष्ठांची” हसतखेळत शाळा घेतली!
विषय इतका साधा पण आपलासा!
जश्या पायवाटा असतात तश्या “हातवाटा”! या हातांनी आपण लहानपणापासून खरच काय काय केलंय याची आठवणच त्यांनी करून दिली. सुरुवात झाली, हातांच्या म्हणीपासून. “हात दाखवून अवलक्षण” पासून जी सुरुवात झाली ती थांबता थांबेना! आमचे सगळे “तरुण” सभासदही उत्साहाने म्हणी आठवत होते.
नंतर गौरीने, हाताचे लहानपणी करत असलेला वापर, सर्वसामान्य वापर, आपल्या संस्कृती मध्ये होत असलेला वापर (रांगोळी काढणे किंवा देवाला दिवा लावणे वगैरे) भावनिक वापर, बोलताना होणारा हाताचा वापर, असे इतके प्रकार विचारले की स्मरणरंजनाबरोबर मेंदूलाही व्यायाम होत होता. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी आम्हा सगळ्यांना निःशब्द राहून, आमच्या तळ हाताकडे निरखून बघायला सांगितलं आणि याच हातांनी आपल्याला किती आधार दिला आहे हे सांगायला सुरुवात केल्यावर, इतकी कृतज्ञता दाटून आली की डोळ्यात पाणी आलं.
एक वकील, संस्कृत मध्ये MA, सायकॉलॉजी मध्ये MA, TISS मधून Gerontology चा डिप्लोमा आणि सध्या IPH आणि निवारा तर्फे चालवण्यात येणारे, सुखासोपन मध्ये ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम, वर्कशॉप घेणे अशी गौरी, “मन मस्तिष्क की पाठशाला” नावाने you tube चॅनेल वर खास ज्येष्ठांसाठी व्हिडिओ करत असते, जे जरूर आपण बघावेत. स्मरणशक्ती साठी ते आवश्यक आहेत.
(ही गौरी नातूच्या कार्यक्रमाची जाहिरात नाही.पण हे तिचे कार्यक्रम जागोजागी व्हावेत आणि ज्येष्ठांनी त्याचा लाभ घ्यावा ही माझी मनापासून इच्छा आहे, म्हणून ही पोस्ट करते आहे)
संध्या घोलप


Leave a Reply