Role reversal चं सुख!
आत्ता आत्ता ते दिवस येऊन गेले जेव्हा माझं बोट धरून माझी मुलं रस्ता ओलांडत होती, मी त्यांचं दप्तर भरून देत होते, डबे भरत होते, हवं नको ते खायला करून देत होते! शाळा संपल्यावर कॉलेजला जाताना, “सांभाळून जा” म्हणत होते. नंतर त्यांचेही संसार वाढले. आता मुलंही चाळीशी पार करती झाली आणि माझी सत्तरी आली!
किती छान वाटतं एकमेकांचे रोल्स बदलले की!
आई, औषध घेतलंस का, आधी ब्रेकफास्ट कर बरं, परवा तुझ्यासाठी डॉ ची अपॉइंटमेंट घेतली आहे बरं का!
आई, आपण ट्रीपला जाणार आहोत. तुझा पासपोर्ट दे माझ्याकडे, पर्स वगैरे घेऊ नकोस, मी आहे ना! सगळं सामान माझ्या बॅगेत टाक!
थांब थांब, क्रॉस करताना घाई करू नकोस. आपण काही पुण्यात नाही आहोत. वाहनं इथून तिथून कुठूनही येणार नाहीत इथे!
आई, दमलीस का? आराम कर आता! उद्या आरामात उठून sight seeing ला जाऊ.
कधी झाला हा “खांदेपालट” ते समजलंच नाही.
मी एकटी खूप फिरत असते, ट्रीपला जात असते, कधी ट्रॅव्हल कंपनी बरोबर अथवा कधी अगदी सोलो! अर्थात ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेलं तरी आपला सगळा भार आपल्याच डोक्यावर असतो. अगदी सामान उचलण्यापासून, एकटीने एअरपोर्ट वर चेक इन करणे, बाहेर पडताना किल्ल्या, पर्स सांभाळणे, आपली तब्येत सांभाळणे वगैरे! मुलाबरोबर फिरताना, माझे हात आणि डोकं पूर्ण रिकामं आहे. कसलीच काळजी नाही घ्यायला लागत.
खांद्यावर पर्स, दप्तर, पाळणाघराची बॅग, एकंदरीतच कुटुंबाचं ओझं घेऊन वावरणारी त्या काळची मी! आता अलगद ते ओझं माझ्या खांद्यावरून काढून, स्वतःच्या खांद्यांवर घेतलेली माझी मुलं बघते, तेव्हा मन भरून येतं!
कौटुंबिक, आर्थिक, भावनिक, सामाजिक… कोणतेही निर्णय घेताना आता वयानुसार मन थोडं बावचळतं. मुलांनी ते ओळखून, सहज निर्णय घेतले आणि ते तडीस नेले की आयुष्याच्या स्पर्धेतलं बॅटन सहज पुढे गेलं आहे याची जाणीव होऊन मन सुखावतं.
ही “खांदेपालट” जितकी सहज आणि नकळत होईल, तितकं चांगलं ना?
(परवाच एक आजी मला म्हणत होत्या, “तू , मुलगा सुनेबरोबर ट्रीपला जाते आहेस, किती भाग्यवान आहेस! नाहीतर माझ्याकडे बघ! गेल्या सोळा वर्षात मी पुण्याच्या बाहेर गेले नाहीये! “😢)
माझे खांदे आता पूर्ण मोकळे आहेत, त्यांच्या खांद्यांवर जाण्यासाठी! यापेक्षा अधिक समाधान काय असतं??
संध्या घोलप



Leave a Reply