हाँगकाँगट्रिप भाग ३

सकाळपासून पाऊस लागला होता. आम्ही Kowloon  Peninsula ला जाणार होतो. त्यासाठी Star ferry ची तिकिटंही इथूनच ऑनलाइन काढली होती.
(अर्थात कुठेही आयत्या वेळेला तिकिटं मिळतातच. पण ऑनलाईन काढली असतील तर सगळीकडे एक्सप्रेस एन्ट्री मिळते. )

अखेर छत्र्या बाहेर काढून निघालो. बसने सेंट्रल Pier ला आलो. Star ferry दर दहा मिनिटांनी हाँगकाँग ते kowloon जाते. बोट खूपच मोठी होती आणि जेमतेम पंधरा माणसं असतील. “कसं काय बुवा परवडतं यांना? ” असा मध्यमवर्गीय विचार माझ्या डोक्यात आलाच.

समुद्राला उधाण आलं होतं आणि आमची बोट एवढी हेलकावे खात होती की भीती वाटावी! दहाच मिनिटात आम्ही Kowloon ला पोहोचलो. उतरल्यावर जाणवलं की मरणाचा वारा आणि गारठा होता. आम्हाला मिळालेल्या सूचनेनुसार, आम्ही छत्र्या घेतल्या होत्या, भरपूर कपडे घेतले होते पण थंडीसाठी काहीच सोय नव्हती! मग मी मुलाला लगेच बोलून घेतलं! 😛

Tsim Sha Tsui promenade वरून पलीकडे सुंदर हाँगकाँग skyline दिसत होती. सकाळ असूनही, मळभ होतं.
या promenade वर दिवस घालवायचा आधी आमचा विचार होता. तिथे बांधलेल्या पायऱ्यांवर बसून, पाण्याकडे बघत, पलीकडे दिसणारं हाँगकाँग बघत, तिथेच लागून असलेल्या छोट्या छोट्या हॉटेलमधून खादाडी करत, K 11 museum बघत दिवस गेलाही असता. पण मला इतकं कापरं भरलं की मी लपायला जागा शोधायला लागले!
तिथेच Avenue of Stars आहे –तिथल्या सिने सृष्टीत काम करणाऱ्या प्रसिद्ध लोकांच्या हाताचे ठसे! आपल्याकडे जसे लोक नट नट्यांचे वेडे आहेत तसेच तिथले लोक प्रत्येक handprint समोर उभं राहून फोटो काढत होते.

मुलगा आणि सून तो भणाणता वारा enjoy करत होते. तेवढ्यात दोघांच्या लक्षात आलं की आई गायब आहे! मी एका मोठ्या कॉलम च्या आड उभी राहिले होते, जेणेकरून वाऱ्यापासून संरक्षण होईल. मुलगा म्हणाला, “अशी एकटीच जाऊ नकोस पुढे. तुला शोधणार कसं?” त्याला म्हटलं, “इथे नावालाही इंडियन माणूस दिसत नाही. त्यात पंजाबी ड्रेस तर नाहीच. त्यावर कडी म्हणजे पुण्यात दुचाकीवर बसणाऱ्या मुली बांधतात तसं तोंड झाकलेलंही कोणीच दिसणार नाही. असं ध्यान शोधायला वेळ नाही लागणार!”

मग आम्ही ब्रूस ली चा स्टॅच्यू शोधत पुन्हा चालायला सुरुवात केली. मला त्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. मुलाला म्हटलं, आता थंडीने माझा स्टॅच्यू व्हायची वेळ आली आहे!  🤣
अखेर promenade सोडून बाहेर पडलो आणि वारा कमी झाला. Tsim Sha Tsui shopping Street वर आमचं भटकणं सुरू झालं. हा भाग इंडियन लोकांचा आवडता. इथे बरीच हॉटेल्स आहेत जिथे नोकरीसाठी आलेले भारतीय राहतात. इथला Nathan रोड प्रसिद्ध! खूप मोठे मॉल्स, ब्रँडेड दुकानं… रस्ता माणसांनी ओसंडून वाहत होता.

तिथे चक्क एक इंडियन हॉटेल सापडलं आणि मी निःश्वास सोडला. मुख्य म्हणजे मेनू कार्ड वाचता येत होतं 😊
जेवण झाल्यावर तिथेच टेम्पल स्ट्रीट मार्केट मध्ये भटकलो आणि परत येताना फेरी टाळून, बसने परत हाँगकाँगला आलो.

थंडीवाऱ्याचा त्रास सोसूनही लक्षात राहिलं ते promenade वरून पाहिलेलं दुसऱ्या तीरावरचं हाँगकाँग हार्बर!

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading