हाँगकाँगट्रिप भाग ४

Visit to the BIG BUDDHA STATUE

आजची ट्रिप आम्ही एका ग्रुप बरोबर इथूनच बुक केली होती. त्यानुसार Kowloon आयलंड मधल्या एका हॉटेल मध्ये सकाळी नऊ वाजता पोहोचायचं होतं. हॉटेल मध्ये भरपूर ब्रेकफास्ट करून निघायचं असं मी आधीच ठरवलं होतं. चायनीज ग्रुप बरोबर गेल्यावर मला खायला काय मिळेल ते माहित नव्हतं. अर्थात हॉटेल मध्ये ही, फळं, फ्रेश ज्यूस, ब्रेड, बटर, हॅश ब्राऊन, कॉफी आणि कप केक्स हे मी बिनधास्त खाऊ शकत होते.

Kowloon हॉटेल ला पोहोचलो. २५ लोक वेळेवर आले होते. तिथून बसने आम्हाला Lantau Island ला जायला ४० मिनिटं लागली. आमचा टूर लीडर जॅकी बडबड्या होता. तो ४० मिनिटं सतत आम्हाला हाँगकाँगची माहिती सांगत होता.
जिथे बुद्धाचा मोठा statue आहे, तिथे पोहोचायला Ngong Ping 360 पासून केबल कारने 25 मिनिटं लागतात आणि तो अनुभव शब्दातीत आहे. ५.७ किमी अंतर या केबल कारने पार पडताना, डोळ्यांचं पारणं फिटतं. जमिनीपासून एवढ्या उंचावरून जाताना, पोटात बाकबुक होत होतं. 😀 त्यात तीन वेळा ही केबल कार, आपली दिशा बदलते. याचं बांधकाम कसं केलं असेल याचं आश्चर्य वाटत राहतं. सगळंच अविश्वसनीय!

अखेर Ngong Ping village ला केबल कार मधून उतरलो आणि हुश्श झालं. प्रशस्त रस्ते, दोन्ही बाजूला दुकानं आणि हॉटेल्स म्हणजे “व्हिलेज”! केबल कार अर्ध्या रस्त्यात असल्यापासूनच बुद्धाची मूर्ती दिसायला लागली होती. ती ३४ मीटर ( ११२ फूट) उंच आणि २५० टन वजनाची आहे! हे ही नवलच. ज्या उंचावर जायला सोईस्कर रस्ते नाहीत, तिथे ही ब्राँझ ची मूर्ती कशी केली? एवढं गाव कसं वसवलं? अर्थात ही मूर्ती जेमतेम ३५-४० वर्षापूर्वी बांधलेली आहे. तरीही टेक्नॉलॉजी ची कमाल वाटते.

Ngong Ping व्हिलेज चा रस्ता पार करून आम्ही आधी Po Lin Monastery बघायला गेलो जी शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. जुन्या वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना. Wood carvings, ceiling, बुद्धाच्या तीन मोठ्या मूर्ती आणि चारही बाजूला भिंतींवर ४”×४” आकाराच्या कोनाड्यात सुमारे दहा हजार बुद्धाच्या मूर्ती! फुलं आणि उदबत्त्यांचा सुवास भरून राहिलेला! सगळे पर्यटक आत शिरल्यावर आपोआपच मौन पाळत होते इतकं शांत वातावरण होतं.

Big buddha च्या २६८ पायऱ्या चढायच्या की नाही याबद्दल मी आधी थोडी साशंक होते. ट्रिपच्या आधी माझ्या cardiologist ने “बिनधास्त जा. काही काळजी करू नकोस” असं सांगितलं होतं. पण एवढ्या पायऱ्या चढू की नको असं काही मी विचारलं नव्हतं. पण तिथलं वातावरण बघून मी चढायचं ठरवलं. मुलगा ही म्हणाला,” तुझी स्ट्रेस टेस्ट होऊन जाईल”. सून थोडी साशंक होती. मी पायऱ्या चढताना, सून माझ्या मागे दोन पायऱ्या होती, माझ्या स्पीड ने… थांबत थांबत! तिची काळजी बघून मला गहिवरून आलं. कसलाही त्रास न होता, मी २६८ पायऱ्या चढलेच. पण मूर्तीच्या बेस खाली जे तीन मजले होते त्यातले दोन मजलेही चढले. म्हणजे अजून ४० पायऱ्या!

एवढ्या उंचीवरून, सभोवार जे निसर्गाचं रूप दिसत होतं, त्याने थकवा पळून गेला. बुद्धाच्या शांत चेहऱ्याकडे बघतच रहावं असं वाटलं. परतायची इच्छा होत नव्हती.
पण घड्याळ परवानगी देत नव्हतं. केबल कार मार्गे खाली उतरलो. येताना पुन्हा गर्द झाडी, थंडगार वारा, धुकं, दूरवर दिसणारा हाँगकाँग एअरपोर्ट, नजरेत भरून घेतलं. आणि Kowloon ला परत आलो. आता kowloon ही माहित झालं होतं. बस स्टॉप वर आलो आणि आमच्या हॉटेलला परत आलो.

दिवस मोठा वाटला! दमले होते. पण मला माझ्या वाढदिवसाची मुलाकडून मोठ्ठी गिफ्ट मिळाली असं मात्र वाटलं.

हाँगकाँग ला येऊन Big Buddha नहीं देखा तो फिर क्या देखा? सगळाच अनुभव अनोखा!!

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading