कालच्या वर्तमानपत्रात ही बातमी पाहिली. “स्वतःसाठी एक तास” अशी स्पर्धा! (अर्थात पुणे तिथे काय उणे?
)
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, आपण थोडं थांबणं आवश्यक आहे, हेच विसरून गेलो आहे. “निवांतपणा म्हणजे काय रे भाऊ? ” असा प्रश्न तरुण पिढीला पडत असावा. पळा पळा, कोण पुढे पळे तो… अशी सगळ्यांची अवस्था.
ही बातमी वाचून मला शाळेतला गणिताचा तास आठवला (माझं गणित चांगलं होतं म्हणून अजूनही ५०- ५५ वर्षानंतरही लक्षात आहे
)
काळ काम वेग, गुणोत्तर आणि प्रमाण यांची मजेशीर गणितं असायची. (आम्ही मराठी माध्यम वाले)
म्हणजे चार पुस्तकांची किंमत सोळा रुपये तर दहा पुस्तकांची किंमत किती? हे सम प्रमाण झालं.
त्या उलट, चार माणसं एक काम वीस दिवसात करतात तर दहा माणसं तेच काम किती दिवसात करतील? इथे माणसं वाढली की काम लवकर पूर्ण होणार त्यामुळे हे झालं व्यस्त प्रमाण! (Inverse proportion)
पण सध्याच्या “काळा”त, “कामा” चा “वेग” इतका वाढला आहे की “व्यस्त” आयुष्यात, आयुष्याचं “गणित”च बदलून गेलं आहे. तिथे कसलंही “प्रमाण” लागू होत नाही.
एखाद्या कंपनीत, एखाद्या प्रोजेक्टवर चार माणसं नेमली असतील तर त्यातली दोन, आपल्या बॉसला सांगतील की बाकीच्या दोघांना काढून टाका. आम्ही दोघे तुम्हाला हेच काम एवढ्याच दिवसात करून देतो! हे गणित कसं सोडवायचं?? स्पर्धा!! ![]()
![]()
आणि मग ते काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगात धावत बसतील!
दिवसभर लॅपटॉप समोर, कानाला हेडफोन लाऊन बसलेली, सतत मिटिंगा, सतत बोलणे, सतत डोळे, कान, हात, तोंड, मेंदू व्यस्त … गुणोत्तराचं प्रमाण काय आहे इथे?
पूर्वीच्या काळी थकला भागला जीव, निवांत बसलेला दिसला की घरात आई/आजी म्हणायची, दमलास ना दादा? बस आता निवांत.
सध्या घरातले सगळेच बिझी! नवरा, बायको कामात, मुलं त्यांचे अभ्यास, क्लासेस, स्पर्धा , परीक्षा. कोण कोणाला निवांत बसायला सांगणार?
पण हे ही आवश्यक आहे … शरीरासाठी, मनासाठी! एवढं जरी आपण समजून घेतलं तर अशी स्पर्धा आपण घरीही करून बघू शकतो. निदान महिन्यातून एकदा, एक तास निवांत बसायला काहीच हरकत नाही. यात मोबाईल दूर ठेवणे अत्यावश्यक!
डोळे बंद करायचे नाहीत, झोपायचं नाही (अगदी डुलकी सुद्धा नाही), गप्पा मारायच्या नाहीत, अनावश्यक हालचाल करायची नाही, चहा, कॉफी, दारू हातात ठेवायची नाही, खायला सुद्धा तोंड उघडायचं नाही! म्हणजे डोळे, हात, कान, तोंड, मेंदू सगळ्यांना विश्रांती द्यायची.
मी विपश्यना करते, त्यामुळे मला वाटलं की त्यात काय? हे सोप्पं आहे! पण स्पर्धेच्या नियमाप्रमाणे ध्यानही धरायचं नाही.
कठीण आहे नक्कीच! पण आपला, आपल्याशी संवाद करायची ही संधी आहे.
तरुण वर्गाला अतिशय आवश्यक आहे.
आजकाल हृदयविकाराचे वाढलेले “प्रमाण” बघता, आपल्या आयुष्याचे गुणोत्तर वाढविण्यासाठी बसा निवांत!
एक तास — स्वतःसाठी!
संध्या घोलप


Leave a Reply