Gratitude – कृतज्ञता

हल्ली आपल्या ओळखीचे कोणी भेटले की दहा पैकी पाच लोक Saurabh Bothra चा online योगाचा क्लास करत असतात. त्यांना gratitude हा शब्द चांगलाच माहित असेल.

क्लासची सुरुवात “Let us start our session with the practice of gratitude. Thank all the people around you, family members, friends, people who work with you, people who work for you….”

अशी होते. सौरभ जसं बोलत जातात तसं माझ्या डोळ्यासमोर ती ती माणसं उभी राहतात. रोज सगळ्यांची आठवण येते म्हणून छान वाटतं.

आज फ्रेंडशिप डे आहे म्हणे.

आमच्या लहानपणी असे काही “डे” नव्हते बाबा. चिमणीच्या दातांनी गोळी अर्धी तोडून जिला देऊ शकतो किंवा जिच्याकडून घेऊ शकतो, ती आपली खास मैत्रीण! मग कट्टी बट्टी होऊ दे, भांडण होऊ दे, तरी मैत्रीत काही कमतरता नसायची.

सौरभ सर म्हणाले की पटकन तीन फ्रेंड्स ची नावं आठवा आणि त्यांना मनातल्या मनात thanks म्हणा. सगळ्यांनीच आपापल्या मित्र मैत्रिणींची नावं आठवली असतील. तर ते हसून म्हणाले, तुम्ही सगळे एक गोष्ट विसरला आहात की आपल्या सगळ्यांचा जवळचा मित्र म्हणजे आपलं शरीर! मित्रासाठी आपण काय करतो? त्याला मदत करतो, त्याचं सगळं ऐकतो आणि त्याच्या बरोबर राहतो आणि त्याला वेळ देतो. आपलं शरीर हे सगळं करत असतं म्हणजे तो सगळ्यात जवळचा मित्र झाला की नाही? मग त्याचे आभार मानायला नकोत का? त्याला आपणही वेळ द्यायला नको का? “

विचार केल्यावर लक्षात आलं की तसंही आपण पटकन कोणाला धन्यवाद देतच नाही. खरं तर “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अन्नदाता सुखी भव, वदनी कवळ घेता” ही आपली संस्कृती! (रस्त्यात शिक्षक भेटले तरी त्यांना खाली वाकून नमस्कार करणारी आमची पिढी! आता “टीचरना” टोपण नावानेच हाक मारतात म्हणे)

पण ती संस्कृती आता mother’s day, father’s day, thanks giving day मध्ये बदलली आहे. खरं तर आमच्या शाळेत, पिठोरी अमावस्येला, मातृदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. त्या दिवशी शाळेत जो खाऊ मिळायचा, “तो आधी आईच्या हातात ठेऊन तिला वाकून नमस्कार करा” असं शाळेत सांगितलं जायचं. आता कोणाला हा “मातृदिन” माहितही नसावा.

आता “आभार” हे फक्त “आभार प्रदर्शन” करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात उरले आहेत. आणि तो कार्यक्रम तर पूर्णपणे औपचारिक असतो. मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं आपण विसरलो आहोत का?

कॉर्पोरेट क्षेत्रात येताजाता thanks, sorry हे शब्द वापरले जातात. ते किती औपचारिक असतात ते त्यांनाच माहीत.

पण आता मैत्रिणीचे मनापासून आभार मानले, “thanks गं” म्हटलं की ती विचारते, काय गं, इतकी formality कशाला? 😀

“Thank you” म्हटल्यावर समोरून “Welcome” आलं की बरं वाटतंच ना? मनापासून मानलेले आभार नक्कीच पोहोचतात. ती formality नाही हे बोलणाऱ्याच्या स्वरातून समजतं.

मी माझ्या मदतनीस मुलीला, ती घरात आल्या आल्या, good morning म्हणते. तिचं उत्तर आलं की त्यातून आपोआपच तिचा मूड कसा आहे ते ही समजतं. ती अवघी २० वर्षांची आहे. मी तिचं काम झाल्यावर, रोज न चुकता तिला “thank you” म्हटलं की ती ही खुश होते आणि वेलकम काकू म्हणत निरोप घेते.

कालच एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला सकाळी व्हॉट्सअँप मेसेज पाठवला होताच. पण नंतर फोनही केला. ती म्हणाली, “कित्ती बरं वाटलं तुझ्याशी बोलून” हे ही आभारच की आणि ते माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचले.

आता आपल्या या वयात तर कुटुंबीय, केअरटेकर, मदतनीस, मुलं बाळं नातवंडं, सुना आणि नातसुना सगळ्यांना वेळोवेळी thanks म्हणावं, कौतुक करावं! आणि ते ही मनापासून! उगाच नाटकी कौतुक करत बसलं तर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त! चहा छान झालाय बरं का, आज तू किती मन लाऊन काम केलंस, आवडलं मला! असं म्हटलं की काम करणाऱ्यालाही आवडतं. दहा वेळा आपण चांगलं वागलो, की कधीतरी रागवायचा हक्क आपोआपच मिळतो. 😀

चला तर मग, आपली “कृतज्ञता” व्यक्त करूया , जमेल तशी, जमेल त्या भाषेत …

पण… मनापासून!! त्यासाठी कुठल्याही “day” ची वाट बघायची आवश्यकता नाही.

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading