अनुभव मॉर्निंग वॉकचा

रविवारची सकाळ म्हणजे भाजीबाजाराचा वार. फिरायला थोडं उशीरा जायचं आणि येताना ताजी ताजी भाजी घेऊन यायची हा माझा आवडता कार्यक्रम. दोन हातात, दोन पिशव्यात वजन उचलता येईल एवढीच भाजी घ्यायची! एकदाच भाजीबरोबर, कलिंगड घेतलं आणि मग एकही रिक्षा येईना म्हणून आठवडाभर हात शेकत बसले. 😛

रविवार सकाळ म्हणजे तशी निवांत असते. भाजी बाजारापुरती लगबग, थोडी गर्दी. गाड्या (पुण्याच्या भाषेतल्या गाड्या … म्हणजे दुचाकी 😛) घेऊन भाजीला येणारे जास्त. माझ्यासारखे चालणारे अगदीच कमी.

अशीच भाजी घेऊन येत होते. रस्ता सुनसान … समोरून एक “काठी” चालत येताना दिसली. साधारण ऐशीच्या वयाची बाई असावी, वजन जेमतेम पंचवीस किलो! चालताना हेलपाटे जात होते. मी पुढे गेले तेवढ्यात मागून एका ताईंनी आवाज दिला, “बाई पडली बाई पडली!”

मी भाजीच्या पिशव्यासह धावत सुटले. त्या ताईही आल्या. त्या आजी इतक्या वेड्यावाकड्या पडल्या होत्या की यांच्या अंगात हाडं आहेत की नाहीत अशी शंका यावी. त्यांना चक्कर आली होती. आम्ही दोघींनी त्यांना उचलायचा प्रयत्न केला तर आम्हाला दोघींनाही झेपेना. आम्ही मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागलो. आसपास कोणीही दिसेना. तेवढ्यात एक पुरुष दुचाकीवरून तिथे येताना दिसला. मी हात दाखवून त्यांना थांबवलं आणि म्हटलं “मदत करा pl.” आम्ही तिघांनी मिळून आजींना उचललं आणि रस्त्याच्या कडेला झाडाच्या पारावर बसवलं. तो माणूस म्हणाला, आप इनको पकडके बैठिये, मैं पानी लेकर आता हुं ” गाडीवर टांग टाकून तो पसार झाला. मी त्या आजींना मागच्या बाजूने धरून ठेवलं. दुसऱ्या ताई, आजींना हलवून , गालावर थपडा मारून उठवू पहात होत्या. तेवढ्यात तो माणूस पाणी घेऊन आला आणि त्यांनी आजींच्या तोंडावर पाणी मारलं. आजी शुद्धीत आल्या, समोर पाण्याची बाटली बघितली आणि त्या घटाघटा पाणी पिऊ लागल्या.

“बीजी, इत्थे कित्थे??” त्याने विचारलं. म्हणजे हे दोघंही पंजाबी आहेत की काय? आणि एकमेकांना ओळखतायत की काय?

ती बीजी काही बोलायला तयार नाही. ती फक्त “नाही नाही” अशी मान हलवत होती.

तो माणूस म्हणाला, “मुझे मालूम है इनका घर. चलो छोडके आते हैं! “

मला माझ्या भाजीच्या पिशव्या आठवल्या. आणि घरी एकटी असलेली माझी ९२ वर्षांची आई आठवली. मी कसं जाणार त्यांच्या बरोबर?

तो माणूस ताईंना म्हणाला, यांना मध्ये बसवूया आणि तुम्ही त्यांना धरून मागे बसा. जवळच आहे त्यांचं घर. त्या ताई तयार झाल्या. बिजींना जबरदस्तीने गाडीवर बसवून ते तिघं रवाना झाले आणि मी भाजी घेऊन घरी आले.

तिथून निघाले पण माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं. अशी मी पडले तर? फ्रॅक्चर झालं तर? आजुबाजूला कोणीच नसेल तर? घरी आई एकटीच असेल तर??

शाळेत खूप वेळा निबंध लिहिले

१) मी मुख्यमंत्री झाले तर…

२) मी पक्षी झाले तर…

३) मी श्रीमंत झाले तर….

त्याच धर्तीवर माझ्या मनात निबंध तयार होऊ लागले.

मी पडले तर…

मी घरचा रस्ता विसरले तर..

मला खूप लागलं तर…

या वयात हे होऊच शकतं ना?

मग शाळेप्रमाणे त्रैराशिक मांडलं. पंचवीस किलो उचलायला तीन माणसं तर मला उचलायला किती लागतील?? 🫣🫣

एवढ्या सकाळी, रस्त्यावर एवढी माणसं नसतातच. मी दुसऱ्या दिवसापासून लगेच थोडी उशिरा फिरायला जायला लागले. 😀

जाताना, आजुबाजूला बघत, कोणती दुकानं लवकर उघडतात त्याचा आढावा घेतला. पंडित पान शॉप, हरे कृष्ण पान शॉप, भगवान पान शॉप, कडक चहा, आईचा चहा, प्रेमाचा चहा अशा टपऱ्या फक्त लवकर उघडतात पण त्या ही सात वाजल्यानंतर. ही दुकानं उघडली की लगेच तिथे चहा – सिगरेट वाल्यांची गर्दी होते. एका हातात चहा, एका हातात सिगारेट घेऊन कंपू करून माणसं उभी असतात. तो वास सहन होत नाही म्हणून आपल्यालाच फुटपाथ वरून खाली उतरून ती गर्दी टाळायला लागते.

मग फुटपाथच्या खाली उतरल्यावर आपल्याला एखाद्या गाडीने उडवलं तर?? नवा निबंध! 🤣🤣

म्हणजे लवकर फिरायला गेलं तर पडायचं नाही आणि पडलेच तर दोघा तिघांना उचलता येईल एवढं वजन कमी करायचं …

सध्या तरी एवढा निश्चय केला आहे.

बाकी रस्त्याचे आणि पान शॉपचे अनुभव पुन्हा कधीतरी!!

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading