आजच बातम्या ऐकल्या की २४,२५ आणि ३१ डिसेंबर ला पब आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास पोलिसांची परवानगी ! म्हणून ही जुनी पोस्ट पुन्हा…
Year END —
डॉ मनोज emergency operations मुळे दमले होते. एक कप कॉफी पिऊन अखेर ते रात्री ३ वाजता हॉस्पिटल मधून बाहेर पडले. गाडी चालवताना झोप येऊ नये म्हणून त्यांनी लताची गाणी लावली होती. सी लिंक वरून गाडी चालली होती. तेवढ्यात त्यांना मागून एक गाडी खूप वेगाने येत असल्याचं जाणवलं. त्यांनी मिरर मधून मागे बघितलं. मागची गाडी त्यांच्या गाडीवर आदळणार तेवढ्यात त्यांनी आपली गाडी डावीकडे वळवली आणि ब्रेक मारून गाडी उभी केली. आत्ता काय होऊ शकलं असतं या विचाराने त्यांना दरदरून घाम फुटला.
“पिऊन चालवतोय वाटतं! निदान दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करायची!” त्यांच्या मनात हा विचार येतच होता तेवढ्यात त्या गाडीने समोरून येणाऱ्या किमान चार गाड्यांना ठोकले होतं.
——-+——-+——-+——-+—–
मुलीला आणि जावयाला एअरपोर्ट वर पोचवायला गेलेल्या सुधीरची, शलाका वाट बघत होती. सुधीर तीन वाजेपर्यंत घरी परत येणं अपेक्षित होतं. आता पहाट होऊ पहात होती तरी सुधीरचा पत्ता नव्हता. त्याचा फोनही नुसताच वाजत होता. शलाका बेचैन झाली होती.
——-+——-+——-+——-+—–
विनय गाढ झोपेत असताना त्याचा फोन वाजला. किती वाजले ते बघून त्याने झोपेतच फोन उचलला.
“हवालदार इंगळे बोलतोय. ७२७४ गाडी तुमची आहे?”
“अरेवा, सापडली का गाडी?” विनय एकदम झोपेतून खडबडून जागा झाला आणि उठून बसला.
“अहो साहेब, आज दुपारीच चोरीला गेली होती. कसलं फास्ट काम करता तुम्ही राव!” विनय खुश होत म्हणाला.
“सर, सी लिंकवर फार वाईट अपघात झालाय गाडीचा. पार चेंदामेंदा झालाय. “
विनयचा चेहरा पांढराफटक पडला. अजून तर लोनचे हप्ते पण संपले नाहीत आणि हे काय नवीनच??
——+——-+——-+——-+——
पोलिस स्टेशन मधून फोन आल्यावर सुपर्णाने घाबरतच फोन उचलला.
“शांभवी तुमची मुलगी आहे का?”
“हो, काय झालं साहेब?”
“दारू पिऊन गाडी चालवली आणि चार गाड्यांना ठोकलय तिने. चौकीत या लगेच”
अठरा वर्ष पूर्णही न झालेली आपली मुलगी गाडी चालवते? ते ही ड्रिंक्स घेऊन? मैत्रिणीकडे पार्टीला जाते सांगून गेली. अजून काय काय माहित नाहीये मला?
——-+——-+——-+——-+——
आपल्या हुशार मुलाला, चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळावी म्हणून अजितकुमारने गेल्याच आठवड्यात रात्री सुद्धा टॅक्सी चालवायचं ठरवलं होतं. शेवटची ट्रीप करून तो घरी जायला निघाला होता. समोरून आलेल्या गाडीच्या दिव्यांनी त्याचे डोळे दिपले आणि…..
——-+——-+——-+——-+——
मनोज, शलाका, विनय, सुपर्णा, अजितकुमारची पत्नी आणि मुलगा पोलीस चौकीत बसले होते.
पाच कुटुंबांची नव्या वर्षीची पहाट नको त्या “END” ने उगवली होती.
——-+——-+——-+——-+——
वर्तमानपत्रातील बातमीवर आधारित![]()
![]()
३१ डिसेंबर जवळ येत आहे. म्हणून …..
संध्या घोलप


Leave a Reply