( बहुत दूर, ऑनलाईन थोडे-बहुत पास)
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला “थोडे दूर, थोडे पास” ही Zee5 वर स्वच्छ, नितळ, मालिका बघितली. मारामारी, हेवेदावे, डावपेच, कट कारस्थान काहीही नाही (मग त्यात काय बघायचं? असं वाटू शकतं) पण मला अशाच गोष्टी बघायला आवडतात आणि ज्या खूपच कमी असतात. त्यामुळे माझा टीव्हीही आपोआप कमी बघितला जातो. मला आवडणाऱ्या इंडियन आयडॉल सारख्या स्पर्धांमध्ये सुद्धा हल्ली गाण्यापेक्षा नाटकच जास्त असतात! ![]()
तर “थोडे दूर थोडे पास” मालिकेत (वेब सीरिज म्हणायचं असतं म्हणे) घरातले ज्येष्ठ वडील, आपल्या मुला-नातवंडांना अट घालतात की सहा महिने कोणत्याही गॅजेट शिवाय राहिलात तर प्रत्येकी एक कोटी रुपये मिळतील. अँडव्हान्स म्हणून ते लगेच प्रत्येकाला ५लाख रुपये बँकेत ट्रान्स्फर करतात. या काळात फक्त फोन नाही, तर वॉशिंग मशीन, मिक्सर, लॅपटॉप, मॉडर्न राहणीमान याशिवाय राहायचं आणि जुन्या काळी या सगळ्याशिवाय लोक कसे वावरत होते याचा अनुभव घ्यायचा. (स्वयंपाकघरात पाटा वरवंटा, कपडे धुवायला धोपटणे वगैरे) हे आता अर्थातच अशक्य कोटीतले वाटते. काही घरात तर, घरातल्या घरातही फोनशिवाय एकमेकांशी संपर्क कसा साधायचा असा हल्ली प्रश्न पडतो. मुलांचे ऑनलाईन अभ्यास, मोठ्यांच्या ऑनलाईन मीटिंग्स, शाळा कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींशी “संवाद” (म्हणजे सोप्या भाषेत flirting) ह्या सगळ्यात केवढा अडथळा!!
केवळ पाच भागांची ही मालिका बघून लगेच संपवली आणि नवीन वर्षाची पहिली सकाळ समोर आली!
रात्री बारा वाजल्यापासून “happy new year” च्या मेसेजची टिवटिव सुरू झाली. सकाळपर्यंत इकडचे मेसेज तिकडे, तिकडचे आणखी कुठे असा रतीब पडत राहिला. एकच फॉरवर्ड शंभर लोकांना/ ग्रुपना फॉरवर्ड करून झालं की इति कर्तव्य पार पाडले! नक्की कोणाचा मेसेज, कोणाला पाठवला आपण बघतो तरी का?
किमान जवळच्या माणसांना तरी निदान सणावारी, वाढदिवसाला किंवा उगाच आठवण आली म्हणून … आपण हल्ली फोन करतो का? आपल्या माणसाचा आवाज ऐकून सुखावतो का?
कामानिमित्त फोन करणे आणि उगाच खुशाली विचारायला फोन करणे यातही फरक आहे ना?
समोरचा “आपलाच” असेल तर सांगतो की “मी बिझी आहे. नंतर फोन करतो.” आपणही ते समजून घेतोच की. पण असा उगाचच आलेला फोन, आवडून जातो हे नक्की.
चला तर मग, आज वर्षाच्या सुरुवातीला असंही एक “resolution” करता येईल की संपर्क वाढवूया, संबंध वाढवूया आणि आठवणी जपूया!
नाहीतर ऑनलाईन थोडे बहुत पास असून सुद्धा, “बहुत दूर” जायला वेळ लागणार नाही!
संध्या घोलप


Leave a Reply