संक्रांतीचे दिवस

सध्या सगळीकडे संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभासाठी छोटे छोटे वाण वाटायला जिन्नस कोणते अशी विचारणा करण्यात येते आहे. म्हणून हे लिहावसं वाटलं.

“Waste warriors” असा नवी मुंबईत एक ग्रुप आहे आणि मी त्याची active member आहे. प्लास्टिकचा वापर किती घातक आहे हे आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यातही छोटे छोटे तुकडे कचऱ्यात टाकले असतील तर ते वेगळे करणेही अशक्य!

Waste management चा पहिला नियम म्हणजे “3Rs” – Refuse, Reuse, Recycle.

सर्वात आधी आपण प्लास्टिकला नकार द्यायला शिकूया. घरात plastic आणणे किंवा दुसऱ्याला देणे हे कमी झालं पाहिजे याची काळजी घेऊया.

प्लास्टिक डबे, बाटल्या, जाड पिशव्या यांचा होईल तितका पुनर्वापर करूया.

जर प्लास्टिक टाकायची वेळ आली तर ते योग्य ठिकाणी टाकूया ज्याचा पुनर्निर्माण करण्यासाठी उपयोग होईल आणि त्याचा छोटा तुकडाही डम्पिंग ग्राऊंडवर जाणार नाही.

वातावरणाचा विचार आता निदान आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी आपण करणे गरजेचे झाले आहे.

संक्रांती निमित्त बऱ्याच छोट्या गोष्टी – प्लास्टिक डबे, बाटल्या, हळदी कुंकू पुड्या असं वाटलं जातं. सगळ्या दुकानात सध्या त्याचे ढीग लागलेले दिसतात. स्वस्तात मस्त म्हणून त्या वस्तू आपण घेतो पण त्यांचा “अंतिम प्रवास” कुठे जाऊन पोहोचतो याचा विचार आपण करायला नको का?

यात हळदी कुंकू समारंभाचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. छोट्या छोट्या प्लास्टिक पिशवीतून हळद कुंकू देणं पूर्णपणे बंद झालं तर आपण कितीतरी wastage वाचवू शकतो. परिसराचा, शुद्ध हवेचा विचार केल्यास भेट /वाण काय द्यावे हे आपल्याला नव्याने सुचेल.

साठ वर्षांपूर्वी माझ्या आईने हळदी कुंकवाला वाण म्हणून पालेभाज्या वाटल्या होत्या! सध्या तर किती तरी महिला तुळस, कडीपत्ता अशी रोपं देताना दिसतात. किंवा एखादं फळ, पाव किलो साखर किंवा इतर धान्य, ज्याचा ताबडतोब वापर /उपयोग होऊ शकतो. किंवा झाडाच्या बिया , हात रुमाल , स्टीलच्या किंवा काचेच्या छोट्या गोष्टी देता येतील. प्लास्टिक टाळण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते करायचा वसा या संक्रांती निमित्त आपण घेऊ.

मी बाहेर जाताना कायम स्टीलची पाण्याची बाटली माझ्या बरोबर घेऊन जाते. लग्नकार्यात मिळणारी छोटी प्लास्टिक बाटली वापरत नाही. Disposable भांड्यांपासून चार हात लांब राहते.

आता माझ्या आयुष्यात मला निर्मळ हवा/पाणी मिळण्याची आशा नाही. पण माझ्या पुढच्या पिढ्यांना जे काही स्वच्छ वातावरण मिळेल त्यात माझा खारीचा वाटा असेल याची मला खात्री आहे.

खारीचं महत्त्व आपण रामायणात वाचलं आहे. सद्भावनेने केलेलं कोणतंही छोटं कार्य ही मोठ्या कार्याची पायाभरणी असते हे लक्षात घेऊ. चला, आपणही खारी होऊया.

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading