माझ्या या आधीच्या लेखात Smruti Mandar Nikumbh-haval यांनी मला assisted living बद्दल माझा अनुभव विचारला होता. म्हणून हा लेख.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अथश्री ही assisted living facility नाहीये तर सिनिअर सिटीझन कम्युनिटी आहे. म्हणजे काय? तर इथे स्वतःच्या मालकीचे फ्लॅट आहेत. (अर्थात आपल्या मर्जीने ते भाड्यानेही देता येतात, पण फक्त ज्येष्ठ नागरिकांना)
पंचवीस वर्षांपूर्वी प्रथम परांजपे बिल्डर यांनी ही संकल्पना पाषाण इथे प्रत्यक्षात आणली. ज्येष्ठ नागरिकांची जीवनशैली लक्षात घेऊन बांधलेले छोटे फ्लॅट्स. हॉल आणि किचन एकत्र, छोटी बेडरूम, छोटी बाल्कनी आणि टॉयलेट. एका मजल्यावर २८ ते ३० फ्लॅट्स आहेत. अशा दोन इमारती मिळून इथे एकूण ३६० फ्लॅट्स आहेत. आवश्यक तिथे सगळीकडे आधारासाठी लोखंडी पाईप लावले आहेत, अगदी बाथरूम मधे सुद्धा !
एकत्र किचन आणि डायनिंग हॉल आहेच. ज्यांना घरी स्वयंपाक करणं जमत नाही, त्यांच्यासाठी जेवायची सोय हवीच ना? तुमच्या आवडीप्रमाणे डायनिंग हॉल मध्ये जाऊन जेवा किंवा घरी मागवा! सर्व सोयी उपलब्ध आहेत.
व्हीलचेअर वरून आरामात जाता येईल असे प्रशस्त व्हरांडे आहेत. हिरवीगार बाग आहे, तिथे बसायला बाक आहेत, एक देऊळ, क्लब हाऊस, छोटसं जिम, लायब्ररी, कार्यक्रमासाठी एक बंदिस्त हॉल आणि एक खुला रंगमंच.
वातावरण छान आहे, समवयस्क मंडळी आहेत त्यामुळे सुख दुःख ही सारखी असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. उगाचच रडत बसणारे चेहरे नाहीत. साध्या साध्या सणावाराला पण नटून थटून येणारी मंडळी बघितली की आनंद पसरतो.
आवश्यकतेप्रमाणे १२/२४ तासाचे काळजीवाहक मिळतात. सुरक्षा सेवा चांगली असल्याने, आमची दारं उघडी राहिली तरी आम्हाला काही काळजी वाटत नाही.
आणीबाणीची वेळ उद्भवल्यास, ॲम्ब्युलन्स बोलावणे, हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे, तुमचे नातेवाईक तिथे येईपर्यंत सर्व प्रकारची काळजी घेणे हे इथला कर्मचारी वर्ग खूप तत्परतेने करतो.
अर्थात, इथेही थोडसं राजकारण, थोडे रुसवे फुगवे, आपापले ग्रुप्स असे आहेतच! पण ते कुठे नसतात? ![]()
![]()
गेल्या वर्षी, मी माझ्या ९३ वर्षाच्या आईला घेऊन इथे येऊन राहण्याचा निर्णय घेतला तो थोडा घाबरतच घेतला होता. पण आता मी इथे इतकी रमले आहे की चार दिवस बाहेर गेले की इथे परत येण्याची ओढ लागते. मला वाटतं, हे ही तुमच्या स्वतःच्या mind set वर अवलंबून आहे. “मला इथे आणून टाकलंय” आणि “मलाच इथे राहायचं आहे” यात तो फरक आहे. इथले बरेच लोक, पंचवीस वर्षांपूर्वी, विचारपूर्वक इथे राहायला आले आहेत. काहींची मुलं जवळपास आहेत, काही सहा सहा महिने अमेरिकेला जाऊन राहणारेही आहेत.
त्यामुळे “अथश्री ही ज्येष्ठांची आनंदी वसाहत” असं म्हटल्यास योग्य होईल.
संध्या घोलप


Leave a Reply